Azam khan Hate Speech Case: समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आणि आमदार आझम खान यांना गुरुवारी न्यायालयाने शिक्षा सुनावली. आझम खान यांना 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून 25 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आझम खान यांनी एक भाषण केलं होत. याच भाषणात त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची नोंद करून घेण्यात आली. त्यानंतर खटला उभा राहिला आणि दोन्ही बाजूंची सुनावणी झाली. त्यावरच न्यायालयाने आज आझम खान यांना दोषी ठरवलं आणि आता त्यांना 3 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने आझम खान यांना 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी त्यांना याप्रकरणात जामीन मिळू शकतो. त्यांच्याकडे जामीन मिळवण्यासाठी एक महिन्याचा वेळ आहे.  


आझम खान यांना 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येईल आणि त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द होईल, हे आधीच स्पष्ट झाले होते. त्यामुळेच न्यायालयाने सुमारे 1.30 तास दोन्ही बाजूच म्हणणं ऐकलं, कारण आझम खानच्या वकिलांनी शिक्षा कमीत कमी व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले. त्याचवेळी आझमला नियमानुसार मोठी शिक्षा व्हावी, असा प्रयत्न फिर्यादी पक्षाने केला. आता आझम खान यांना हवे असल्यास ते या निर्णयाला उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात.     


काय आहे प्रकरण? 


चिथावणीखोर भाषणाशी संबंधित हे प्रकरण 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील आहे. 27 जुलै 2019 रोजी भाजप नेते आकाश सक्सेना यांनी आझम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आझम खान यांनी रामपूरच्या मिलक विधानसभा मतदारसंघात जनतेला संबोधित करताना चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी आझम खान यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन डीएम यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली. 3 वर्षांनंतर आज याच प्रकरणातील सुनावणीनंतर आझम खान यांना न्यायालयाने दोषी ठरवले आणि शिक्षा सुनावली.


इतर महत्वाची बातमी: 


What Is MP-MLA Court: आमदार-खासदारांसाठी असणारे हे एमपी-एमएलए कोर्ट आहे तरी काय?