Himachal Pradesh Assembly Election 2022 : सध्या हिमाचल प्रदेशात निवडणुकांचं (Himachal Pradesh Election) बिगुल वाजलं आहे. सर्वच पक्षांनी सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. पण या निवडणुकीत चर्चा आहे ती एका 'चहावाल्याची'. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Narendra Modi) ब्रँडिंग 'चायवाला' शब्द वापरून केलं होतं. याचा मोठा फायदा भाजपला (BJP) झाला. 2014 मध्ये भाजपचं कॅम्पेन यशस्वी झालं आणि मोदी लाट (PM Modi) आली. भाजपनं देशात एकहीती सत्ता मिळवली. आता हिमाचलमध्येही भाजपकडून पुन्हा एकदा चहावाल्याला तिकीट देण्यात आलं आहे. पण हा चहावाला सर्वसामान्य चहावाल्यांहून फार वेगळा आहे. हा चहावाला सामान्य चहावाल्यांसारखा नाही. तर हा चहावाला कोट्यधीश आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या उमेदवाराची जोरदार चर्चा आहे. राजधानी शिमल्यात (Shimla) भाजपनं एका चहावाल्याला तिकीट दिलं आहे. हा 'चहावाला' उमेदवार म्हणजेच, संजय सूद. संजय सूद यांच्या संपत्तीबाबक ऐकाल तर अवाक् व्हाल. कारण हे चहावाले असले तरी कोट्यवधींचे मालक आहेत.
भाजपनं सूद यांना तिकीट दिल्यामुळे शिमला विधानसभेची लढत आणखी रंजक बनली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देशात 'चहावाला' हे टोपण नाव मिळाल्यानं या नावाचीही चर्चा होत आहे.
कोट्यवधींचे मालक संजय सूद
संजय सूद यांचं चहाचं दुकान आहे, त्यामुळे लोक त्यांना 'चहावाला' म्हणतात. पण असं असलं तरी ते इतर सर्वसामान्य चहावाल्यांसारखे मुळीच नाहीत. सूद कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत. संजय सूद यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची आणि त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती 2.7 कोटींची आहे. संजय सूद यांच्याकडे 1.45 कोटी रुपयांची स्थावर आणि 54 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर त्यांची पत्नी सुनीता सूद यांच्याकडे 46 लाख आणि 25 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी संजय सूद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी या जागेवर भाजपकडून मंत्री सुरेश भारद्वाज यांनी चार वेळा निवडणूक लढवली आहे. भाजपकडून यंदा कसुंपटी या मतदारसंघातून संजय सूद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाकडून तिकीट मिळाल्यानंतर सूद म्हणाले की, "भाजपनं मला शिमला अर्बनसारख्या हॉट सीटवरुन उमेदवारी दिल्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. यामुळे माझा आत्मविश्वास कित्येक पटींनी वाढला आहे. कारण माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांसाठी हा मोठा सन्मान आहे."
कोण आहे भाजपचा शिमलातील उमेदवार?
TOIनं दिलेल्या वृत्तानुसार, संजय सूद स्वत:बद्दल सांगताना म्हणाले की, "एक म्हण आहे की, लोक तुमचा संघर्ष पाहत नाहीत, तर ते तुमचं यश पाहतात. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी सांगितलं की, त्यांचा जन्म एका गरिब कुटुंबात झाला. त्यांनी 1991 मध्ये शिमल्यात चहाचं दुकान सुरु केलं होतं. तर यापूर्वी कॉलेजची फी भरण्यासाठी ते वृत्तपत्र विकण्याचं काम करायचे."
त्याच्या संपत्तीबाबत बोलताना ते म्हणाले की, "त्यांनी पुढे पैशांची खूप बचत केली. मी ज्यावेळी संपत्ती विकत घेतली होती. त्यावेळी तिची किंमत एवढी नव्हती. याशिवाय मी दररोज 100 रुपये टपाल खात्यात जमा करत असे. गरीब कुटुंबातील असूनही माझ्या मनात सेवेची भावना होती."
संजय सूद म्हणाले की, "पाच वर्षे विद्यार्थी परिषदेत काम केलं. मात्र आर्थिक अडचणींमुळे ते थांबवावं लागलं. त्यानंतर त्यांनी दोन वर्ष वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम केलं. पुढे त्यांनी 1991 मध्ये हे चहाचं दुकान उघडलं."
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, तरिही दबदबा
संजय सूद हे कोणत्याही राजकीय पार्श्वभूमीतून आलेले नसून त्यांना नेहमीच जनतेची सेवा करायची होती. त्यामुळेच 1980 साली भाजपच्या स्थापनेपासून ते सतत पक्षासाठी काम करत आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसली तरी त्यांचा दबदबा मात्र त्यांच्या मतदारसंघात आहे.
पंतप्रधान मोदींशी होतेय तुलना
'चहावाला' हे नावही पीएम मोदींशी संबंधित आहे, त्यामुळे संजय सूद यांची तुलना पंतप्रधान मोदींशी केली जात आहे. यावर सूद म्हणाले, "कृपया त्यांची माझ्याशी तुलना करू नका, ते एक अतुलनीय व्यक्तिमत्त्व आहे. मला त्यांच्या नखाचीही सर नाही."
12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान
हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. येथे 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. याबाबतची अधिसूचना 17 ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आली. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 55 लाख 07 हजार 261 मतदार आहेत. त्यापैकी 27 लाख 80 हजार 208 पुरुष तर 27 लाख 27 हजार 16 महिला मतदार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Himachal Pradesh Election 2022: भाजप-काँग्रेसचं काय आहे राजकीय गणित, जाणून घ्या