तिरुवअनंतपूरम : स्कायमेटकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार यंदाच्या वर्षी मान्सून 30 मे रोजी दोन दिवस मागे पुढे केरळात दाखल होऊ शकतो असं सांगण्यात आलं होतं. भारतीय किनारपट्टी भागांमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी पूरक वातावरण तयार होत असतानाच दोन चक्रीवादळं निर्माण होऊन गेली असली, तरीही मान्सून काही वाट चुकलेला नाही. कारण, ठरल्याप्रमाणे हा दरवर्षी येणारा आणि हवाहवासा पाहुणा शनिवारी म्हणजेच 30 मे 2021 रोजी केरळात दाखल झाला आहे. स्कायमेट वेदरनं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
1 जूनचा मान्सूनचं आगमन होणार असल्याचा प्राधमिक अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. पण, त्यानंतर वाऱ्यांची बदललेली दिशा आणि पूरक वातावरणामुळे मान्सूनपूर्व सरींपाठोपाठ या वरुणराजानं केरळावर आणि देशावर कृपा केलीच.
मान्सूनच्या आगमनासाठी ठराविक गोष्टींची आणि त्यांच्या पूर्ततेची आवश्यकता असते. दक्षिण पूर्व अरबी समुद्रातील वारे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावून गेले. आता येत्या कालावधीत मान्सूनसाठी देशात पूरक वातावरण निर्मिती होणार असून, तो देशाचा मोठा भाग व्यापेल. उत्तर पूर्व भागातही याचे पडसाद दिसून येतील. किनारपट्टी भागामध्ये जून महिन्याच्या पहिल्या भागात वादळीवाऱ्यांची निर्मिती मान्सूनसाठी आणखी पूरक ठरणार आहे.
Cyclone Tauktae : तोक्ते तक्रीवादळाचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यालाही फटका
याच धर्तीवर उत्तर अंदमान समुद्र आणि पोर्ट ब्लेअर, निकोबार, मायाबंदर अशा भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. केरळ, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, लक्षद्वीप या भागांमध्येही पावसाची येत्या काळात दमदार हजेरी असणार आहे. दरम्यानच्या काळात समुद्रही खवळलेला असेल, त्यामुळं मासेमारांनीही सतर्क रहावं असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.