नवी दिल्ली : सात तासानंतर अखेर काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक संपली असून सोनिया गांधी तूर्तास हंगामी अध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत. पुढच्या 6 महिन्यात काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. सोनिया गांधींना मदतीसाठी 4 सदस्य कमिटी बनवणार असून जी दैनंदिन कामकाजात मदत करणार आहे.


सोनिया गांधी यांच्या हंगामी अध्यक्षपदाला एक वर्षे पूर्ण झाल्याने नव्या अध्यक्ष निवडीची चर्चा सुरु झाली होती. अशातचं पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनीच पक्षाच्या अवस्थेबद्दल जागृत करणारं पत्र सोनिया गांधींना लिहिण्याचं धाडस दाखवलं. त्यामुळे अधिकचं गुंता निर्माण झाला होता. मात्र, अखेर सोनिया गांधी यांचीच 6 महिन्यांसाठी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यात नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे.

बैठकीतले महत्वाचे मुद्दे

  • पत्राचा विषय माझ्यासाठी संपला, ज्यांनी हे पत्र लिहिले, त्यांच्याबद्दल मनात काहीही नाही, सोनिया गांधी यांचे बैठकीत वक्तव्य.

  • अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अधिवेशन पुढच्या दोन ते तीन महिन्यात बोलावलं जाणार, ज्यात अध्यक्षपदाची निवड होऊ शकते.

  • अध्यक्षपदाच्या निवडीला एक कालमर्यादा असावी हा मुद्दा राहुल गांधी यांनी बैठकीत सुचवला.

  • पत्र लिहिणार्‍या पैकी एक जितीन प्रसाद यांनी बैठकीत माफी मागितली. आपण गांधी कुटुंबा सोबतच आहोत असं सांगितलं.

  • या सर्व सीनियर लोकांसोबत मी काम केलं आहे, त्यांनी अशी पत्र पाठवणं हे दुर्दैवी, कॅप्टन अमरिंदरसिंग यांचं बैठकीत मत.

  • बैठकीदरम्यान मीडियामध्ये मिनिटामिनिटाला जे तपशील बाहेर येत होते, त्याबद्दलही बैठकीमध्ये चर्चा. अहमद पटेल यांनी नेत्यांची नावे घेऊन त्यांना तंबी दिली.

  • या पत्राचा ड्राफ्ट तुमच्या शिवाय कोणी बनवू शकत नाही, असं बैठकीत अहमद पटेल आनंद शर्मा यांना म्हणाले.


बैठकीत नाराजी नाट्य

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीआधी काँग्रेसच्या 23 नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रावरुन आधीच वाद निर्माण झाला. या 23 नेत्यांनी पत्र लिहून एकप्रकारे भाजपशी संधान बांधलं, अशा कठोर शब्दात राहुल गांधी यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींना थेट ट्विटरवर उत्तर दिलं. यामुळे पक्षातील वादविवाद समोर आले. मात्र, त्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांना कपिल सिब्बल यांच्या ट्वीटला कोट करु राहुल गांधी यांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं सांगूत मीडियातील चुकीच्या वृत्तांना आणि माहितीला बळी पडू नका, असं आवाहन केलं. मग काही वेळात सिब्बल यांनी राहुल गांधींना उत्तर दिलेलं ट्वीट डिलीट केलं.

सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या 'त्या' 23 नेत्यांची भूमिका समोर

कपिल सिब्बल यांचं ट्विटरवरुन उत्तर अन् डिलीट

राहुल गांधी यांनी प्रश्न विचारल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी थेट ट्वीट करुनच त्यांना उत्तर दिलं. कपिल सिब्बल यांनी लिहिलं आहे की, "राहुल गांधी म्हणतात आम्ही भाजपशी संधान साधलं. राजस्थान हायकोर्टात काँग्रेसची बाजू मांडली. भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी पक्षाला मदत केली. मागील तीन वर्षात कोणत्याही विषयावर भाजपच्या बाजूने वक्तव्य केलं नाही. तरीही आम्ही भाजपला मदत करतोय!" मात्र, रणदीप सुरजेवाला यांच्या ट्वीटनंतर सिब्बल यांनी हे ट्वीट डिलीट केलं.

Narayan Rane | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कार्यपद्धतीला कंटाळले आहेत, नारायण राणेंचा काँग्रेसवर निशाणा