मुंबई : '2019 मध्ये मोदींच्या हाती सत्ता जाऊ देणार नाही,' असं म्हणत केंद्रात पुन्हा यूपीएचीच सत्ता येणार असा निर्धार सोनिया गांधींनी व्यक्त केला आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये त्या मंबईत बोलत होत्या.
"भाजपची सत्ता आल्यापासून देशात घडणाऱ्या घटना देशाच्या एकतेला धोकादायक आहेत. 2014 ला सत्ता मिळवण्यासाठी खोटी वचनं देऊन मोदींनी जनतेची फसवणूक केली आहे," असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
'2019 मध्ये सत्तेत नक्की पुनरागमन करणार'
“तसेच राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने चांगले प्रदर्शन केलं आहे. आता आमचं पुढचं लक्ष्य कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर आहे. ही निवडणूक जिंकणं आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. 2019 साठी आमच्या आशा पल्लवीत झाल्या असून, आम्ही सत्तेत पुन्हा पुनरागमन करु,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
'2014 मध्ये यूपीएची कामं आम्ही जनतेपर्यंत पोहचवू शकलो नाही'
यूपीएच्या कार्यकाळाबद्दल बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, “आम्ही यूपीए सरकारच्या कार्यकाळात चांगलं काम केलं होतं. पण आम्ही आमचं काम जनतेपर्यंत पोहोचवू शकलो नाही. भाजपने याचाच फायदा घेतला. भाजपने आमच्यापेक्षा चांगली प्रचार यंत्रणा राबवली. त्यांनी आपलं मार्केटिंग अतिशय उत्तम पद्धतीने केलं. त्यामुळे ते 2014 च्या निवडणुकीत विजयी होऊ शकले.”
'गरिबांसाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही'
सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, “मी एक काँग्रेसची महिला कार्यकर्ता आहे. माझ्या मते, चांगला समाज निर्माण करण्यासाठी विकासाची गंगा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. सध्या देशातील गर्भश्रीमंतांना गुपचुप पैसे दिले जातायत. पण जेव्हा गरिबांसाठी अर्थसंकल्पात तरतुदीचा विषय येतो, तेव्हा त्यावरुन गदारोळ माजवला जातो.”
यूपीएच्या काळात देशाचा विकासदर चांगला
शिवाय, सत्तेत बँलेंस गव्हर्नमेंट असणं गरजेचं असल्याचं सांगून, समाजातील प्रत्येक व्यक्तीला विकासाचा लाभ मिळाला पाहिजे, असं त्या म्हणाल्या. तसेच, यूपीए सरकारच्या काळातच देशाचा विकास दर चांगला असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
मोदी सरकारवर सडकून टीका
मोदी सरकारवर सडकून टीका करताना त्या म्हणाल्या की, “मला घोषणाबाजी आणि आश्वासनं देणं आवडत नाही. आम्ही जनतेशी कधीही खोटं बोलत नाही. आम्ही असं कुठलंही वचन देत नाही, जे पूर्ण करणं अशक्य आहे. जुनी आश्वासनं पूर्ण करण्याऐवजी रोज नवनवी स्वप्नं दाखवली जात आहेत.”
दरम्यान, कार्ती चिदंबरमच्या मुद्द्यावर बोलणं त्यांनी यावेळी टाळलं. तसेच सत्ताधारी भाजपा सीबीआयचा दुरुपयोग करत आहे. आणि ठोस पुरावा नसतानाही एखाद्याला त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
2019 मध्ये मोदींना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही : सोनिया गांधी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Mar 2018 04:32 PM (IST)
'2019 मध्ये मोदींच्या हाती सत्ता जाऊ देणार नाही,' असं म्हणत केंद्रात पुन्हा यूपीएचीच सत्ता येणार असा निर्धार सोनिया गांधींनी व्यक्त केला आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये त्या मंबईत बोलत होत्या.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -