बंगळुरु : कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने मुलींच्या शिक्षणासाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुलींना प्राथमिकपासून पदव्युत्तर शिक्षण मोफत देणार असून त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होईल. यासाठी 95 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


यंदाच्या बजेटमध्ये या निर्णयाची घोषणा झाली आहे. सिद्धारामय्या यांच्याकडे अर्थमंत्रालयाचाही भार आहे.

बंगळुरु सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री सिद्धरामय्या बोलत होते. खरंतर याआधीपासूनच कर्नाटकमध्ये माध्यमिक शिक्षण मोफत आहे. पण नव्या निर्णयामुळे मुलींना पदवीआधीचं आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यास मदत होणार आहे.

कर्नाटकात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची घोषणा अतिशय महत्त्वाची आहे. या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी मोफत बस पास सुविधा तसंच पदवीच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, उच्च शिक्षण मंत्री बसवराज रायारड्डी म्हणाले की, "राज्य सरकार 16 नवी निवासी पदवी महाविद्यालयं स्थापन करणार आहे, जेणेकरुन आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता येईल."