मुंबई : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज विरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक डिजिटल स्वरुपात पार पडणार आहे. या डिजिटल बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हेदोघेही सहभागी होत आहेत. याशिवाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह विरोधी पक्षांचे काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षांना बरोबर घेऊन मोदी सरकारला घेरण्याची रणनिती म्हणून सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीकडे पाहिलं जात आहे. 


सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या आजच्या विरोधी पक्षांच्या महत्त्वाच्या बैठकीत केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका कशी मांडावी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काँग्रेसच्या पक्षप्रमुख आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या बैठकीचं नेत्तृत्व करणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड आण तमिळनाडू या राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर राज्यांतील विरोधी पक्षांच्या नेत्यांचा समावेश असणार आहे. 


काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनात पेगॅसस, हेरगिरीचा मुद्दा, महागाईचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला होता. राहुल गांधी यांनी यावेळी आक्रमक भूमिका मांडली होती. अशीच काहीशी भूमिका येणाऱ्या काळात कशी मांडता येईल? काय नेमके विषय असतील, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या जगभरात चर्चेत असणारा अफगाणिस्तानचा मुद्दा आणि त्यामुळे ऐरणीवर आलेला देशासह राज्य सुरक्षेचा प्रश्न यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, देशात मोदी सरकारकडून होत असलेली विरोधी पक्षांची मुस्कटदाबी आणि 2024 लोकसभा निवडणुकीची व्युहरचना आणि पर्यायी नेतृत्व यासह अनेक विषयांवर या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. 


दरम्यान, 22 मे 2020 रोजीही सोनिया गांधी यांनी एक ऑनलाईन बैठक घेतली होती. त्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांच्यासह 22 पक्षाचे नेते हजर होते असा दावा काँग्रेसनं केला होता. त्या बैठकीबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली होती. या बैठकीत मोदी सरकार विरोधात रणनितीसंदर्भात चर्चा झाली होती.