Sonia Gandhi : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी आजची चौकशी संपली आहे. ईडी अधिकाऱ्यांनी सोनिया गांधी यांची जवळपास तीन तास चौकशी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुढील चौकशीबाबत सोनिया गांधी यांना नवीन समन्स देण्यात आले नाही. ईडीने सोनिया गांधी यांची तीन दिवस 11 तास चौकशी केली आहे.
ईडी अधिकाऱ्यांनी मंगळवारी सोनिया गांधी यांची जवळपास सहा तास चौकशी केली होती. त्यानंतर आज पुन्हा चौकशीसाठी येण्यास सांगितले होते. त्याआधी 21 जुलै रोजीदेखील ईडीने सोनिया गांधी यांची दोन तास चौकशी केली होती. नॅशनल हेराल्डची मालकी असणाऱ्या 'यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीच्या व्यवहारात आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याची चौकशी सध्या सुरू आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन करून सोनिया गांधी यांची चौकशी करण्यात आली. ईडी अधिकाऱ्यांनी 'यंग इंडिया' आणि काँग्रेसमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांबाबत प्रश्न विचारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याआधी ईडी अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांची पाच दिवस 50 तास चौकशी केली होती.
दरम्यान, सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात काँग्रेसने आजही देशभरात सत्याग्रह आंदोलन केले. मंगळवारीदेखील सोनिया गांधी यांच्या चौकशीच्याविरोधात काँग्रेसने आंदोलन केले होते. दिल्लीत राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
नॅशनल हेराल्ड प्रकरण काय?
नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली हे वृत्तपत्र सुरू केले होते. हे वृत्तपत्र चालवण्याची जबाबदारी 'असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड' (एजेएल) नावाच्या कंपनीकडे होती. या कंपनीवर सुरुवातीपासून काँग्रेस आणि गांधी घराण्याचे वर्चस्व होते. तब्बल 70 वर्षांनंतर 2008 मध्ये हे वृत्तपत्र तोट्यात गेल्यामुळे बंद करावे लागले. त्यानंतर काँग्रेसने पक्ष निधीतून एजेएलला 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले. मग सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 2010 मध्ये 'यंग इंडियन' नावाची नवी कंपनी स्थापन केली. असोसिएटेड जर्नल्सला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनला कंपनीत 99 टक्के हिस्सा मिळाला. सोनिया आणि राहुल गांधी यांची यंग इंडियन कंपनीत 38-38 टक्के हिस्सेदारी आहे. बाकीचा हिस्सा मोतीलाल बोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता.
दरम्यान याप्रकरणी ईडीनं यापूर्वी सोनिया गांधी यांचे पुत्र आणि खासदार राहुल गांधी यांचीही चौकशी केली होती. त्याचवेळी काँग्रेसनं ईडीच्या कारवाईचा निषेध करत राजकीय सूडबुद्धीनं ही कारवाई करत असल्याचं म्हटलं होतं. चौकशीच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशव्यापी निदर्शनं केल्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यातही घेण्यात आलं होतं.