एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी ट्वीट करून भाजप सरकारवर टीका केली. त्यांनी म्हटले की, कावड यात्रेकरूंसाठी ठिकठिकाणी फुलं उधळण्यात आली. त्यांच्या पायाला मलम लावण्यात आले. कावड यात्रेकरू नाराज होऊ नयेत यासाठी उत्तर प्रदेश सरकारने यात्रेच्या मार्गावर असणारी मटणाची दुकाने बंद केली आहेत. ही 'रेवडी संस्कृती' नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुस्लिमांनी मोकळ्या जागेवर काही मिनिटांसाठी नमाज अदा केली तरी गदारोळ केला जातो. मुस्लिम असल्याने पोलिसांची गोळी, युएपीए, राष्ट्रीय सुरक्षा कायदा, बुलडोझर कारवाईचा सामना करावा लागत असल्याचे ओवेसी यांनी सांगितले.
कावड यात्रेकरूंना मुस्लिम पोलीस अधिकाऱ्याचे नावही सहन होत नसल्याचा आरोप ओवेसी यांनी केला. कावड यात्रेकरूंच्या भावना इतक्या तीव्र असतात की त्यांना एका मुस्लिम अधिकाऱ्याचे नावही पोलीस ठाण्यातील पाटीवर सहन होत नाही. हा भेदभाव का, एकाचा द्वेष आणि दुसऱ्यावर प्रेम का, असा सवालही ओवेसी यांनी उपस्थित केला.
सरकारकडून एका समुदायासाठी वाहतूक वळवली जाते. तर, दुसऱ्यांसाठी घरावर बुलडोझर फिरवला जात असल्याचे ओवेसी यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत बोलताना नागरिकांना मोफत योजना देण्याच्या विरोधी पक्षांच्या घोषणेवर टीका केली होती. यावेळी त्यांनी मोफत योजनांना रेवडी संस्कृती वाढत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले होते.