Sonia Gandhi Boat Ride: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे लडाख दौऱ्यानंतर श्रीनगरमध्ये आहेत, या दरम्यान त्यांची आई, म्हणजेच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) या राहुल गांधींना भेटण्यासाठी श्रीनगरला पोहोचल्या. श्रीनगरमध्ये आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी सोनिया गांधींनी बोटीतून प्रवास केला. या बोट सफारीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सोनिया गांधी बोटीत बसलेल्या दिसत आहेत.


सोनिया गांधी राहुल गांधींसोबत श्रीनगर दौऱ्यावर


एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटल्यानुसार, काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी श्रीनगरमध्ये (Srinagar) पोहोचल्या आणि त्यांनी निगीन तलावात (Nigeen Lake) बोटीतून सफर केली. यानंतर त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितल्याप्रमाणे, राहुल गांधी लडाखच्या एका आठवड्याच्या दौऱ्यानंतर शुक्रवारी (25 ऑगस्ट) संध्याकाळी श्रीनगरला पोहोचले, यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजेच शनिवारी त्यांनी त्यांच्या आईची भेट घेतली. राहुल गांधी यांची बहीण प्रियांका गांधी-वाड्रा तिचे पती रॉबर्ट-वाड्रा यांच्यासोबत श्रीनगरला येण्याची शक्यता आहे.






श्रीनगरमध्ये कुठे आहे गांधी कुटुंबाचा मुक्काम?


राहुल गांधी यांनी निगीन तलावातील (Nigeen Lake) हाऊसबोटमध्ये मुक्काम केला. शनिवारी रैनावरी भागातील हॉटेलमध्ये गांधी कुटुंब मुक्कामाला होते. या हॉटेलशी गांधी घराण्याच्या जुन्या आठवणी जोडल्या गेल्याचं पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं. येथे दोन रात्री मुक्काम केल्यानंतर गांधी कुटुंब गुलमर्गलाही जाण्याची शक्यता आहे. या काळात कुटुंबाचा कोणताही राजकीय कार्यक्रम निश्चित नसल्याचंही सांगण्यात येत आहे.


'श्रीनगरमधील भेट ही केवळ कौटुंबिक'


श्रीनगरमधील भेट ही निव्वळ वैयक्तिक आणि कौटुंबिक भेट असून कोणत्याही पक्षाच्या नेत्यासोबत राजकीय भेट होणार नाही, असं काँग्रेस नेते म्हणाले. राहुल गेल्या एका आठवड्यापासून लडाखच्या केंद्रशासित प्रदेशात (UT) होते, त्यानंतर कारगिलमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर शुक्रवारी (24 ऑगस्ट) सकाळी ते श्रीनगरला पोहोचले.


तत्पूर्वी, राहुल गांधी 17 ऑगस्टला लडाखला पोहोचले होते. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर केंद्रशासित प्रदेश बनलेल्या लडाखची ही त्यांची पहिली भेट होती.


लडाखच्या रस्त्यावर स्मार्ट बाईक रायडर


कलम 370 आणि 35 (अ) रद्द केल्यानंतर, जम्मू-काश्मीरपासून लेह-लडाख वेगळं झाल्यानंतर आणि नवीन केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिला लडाख दौरा होता. यावेळी राहुल गांधी लडाखच्या रस्त्यांवर KTM बाईकवर स्पोर्ट्स हेल्मेट घालून दिसले. दरम्यान, लडाखच्या मुक्कामादरम्यान राहुल गांधी कारगिल स्मारकावर गेले होते. यावेळी त्यांनी स्थानिक तरुणांशी देखील संवाद साधला.


हेही वाचा:


Rahul Gandhi: बाईक चालवत राहुल गांधींचा लडाख दौरा; पँगॉन्ग लेकवर दिमाखात बाईकस्वारी, पाहा हटके अंदाज