नवी दिल्ली भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेची सुरुवात झाली असून प्रज्ञान रोव्हरने चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील मातीचे परीक्षण सुरू केले आहे. इस्रोने रविवारी, ट्वीट करत याची माहिती दिली. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, अंतराळ विज्ञानाच्या इतिहासात पहिल्यांदा चांद्रयान-3 ने (Chandrayaan-3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील (Moon South Pole) मातीचे परीक्षण केले. पृष्ठभागाच्या खाली 10 सेमी पर्यंत तापमानात फरक होता, असे इस्रोने म्हटले. 


इस्रोने सांगितले की, "दक्षिण ध्रुवाभोवती चंद्राच्या मातीचे तापमान प्रोफाइलिंग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच एखाद्या देशाने सॉफ्ट लँडिंग केले आहे.  इस्रोने मातीच्या तापमानाचा आलेखही शेअर केला आहे. आलेखामध्ये तापमान उणे 10 अंश सेल्सिअस ते 50 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. 






इस्रोकडून नवीन अपडेट्स 


भारताची अंतराळ संस्था इस्रोने सांगितले की, ChaSTE पेलोड चंद्राच्या पृष्ठभागाचे थर्मल वर्तन समजून घेण्यासाठी ध्रुवाभोवतीच्या चंद्राच्या वरच्या मातीच्या तापमान प्रोफाइलचे मोजमाप करते. यात तापमान तपासले जात आहे. चंद्राच्या पृष्ठभागाच्या खाली 10 सेमीपर्यंत पोहचण्यास सक्षम आहे. 


चंद्राच्या मातीच्या तापमानाची नोंद


ISRO ने सांगितले की त्यात 10 वेगवेगळे तापमान सेंसर आहेत. या आलेखामध्ये चंद्राच्या तापमानातील फरक दाखविला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पुढील संशोधनही सुरू आहे.


23 ऑगस्ट रोजी झाली होती सॉफ्ट लँडिंग


शनिवारी, इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 मोहिमेतील तीनपैकी दोन उद्दिष्टे साध्य झाली आहेत. तर तिसऱ्या उद्दिष्टांतर्गत वैज्ञानिक प्रयोग सुरू आहेत. चांद्रयान-3 मिशनचे सर्व पेलोड्स सामान्यपणे काम करत आहेत. चांद्रयान-3 ने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले होते. 


विक्रम लॅंडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाचे नाव 'शिवशक्ती'


भारताचे मून लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण 'शिवशक्ती' म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. शनिवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बंगळुरु येथील इस्रोच्या मुख्यालयात आले. त्यानंतर शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यासाठी ते इस्रो कॅम्पसमध्ये पोहोचले यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.