Budget Session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभेतील नेत्यांसोबत ही बैठक झाली. या बैठकीत 1 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करण्यात येणाऱ्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अधिवेशन काळात विविध मुद्दे मांडण्यासाठी काँग्रेस इतर समविचारी विरोधी पक्षांसोबत काम करेल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.


शेतकऱ्यांचे प्रश्न, चीनच्या सीमेवरील तणाव आणि बदललेली परिस्थिती, कोरोनाचे संकट, एअर इंडियाचा मुद्दा यावरुन मोदी सरकारला घेरण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या सर्व मुद्यावरुन काँग्रेस लोकसभा आणि राज्यसभेत आवाज उठवणार आहे. तसेच अन्य काही मुद्दे देखील काँग्रेसकडून संसदेत मांडले जाणार आहेत.


अधीर रंजन चौधरी, आनंद शर्मा यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित 


सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संघटनेचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल, ए के अँटनी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते आनंद शर्मा, जयराम रमेश, गौरव गोगोई, मनीष तिवारी, के सुरेश आणि पक्षाचे लोकसभेतील व्हिप मणिकम टागोर हे उपस्थित होते.


अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता 


यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसच्या रणणितीवरुन विविध मुद्यावरुन सरकार आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात ताळमेळ आहे की नाही, मागील अधिवेशनाप्रमाणे तृणमूल काँग्रेस हा काँग्रेसपासून दूर राहतो का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.  विशेष म्हणजे यावेळचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 5 राज्यांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेदरम्यान होत आहे. त्यामुळे त्यावरुनही संसदेत वातावर तापण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या: