विजापूर (कर्नाटक) : 'मोदीजी एखाद्या अभिनेत्याप्रमाणे भाषण देतात. पण, फक्त भाषणं देण्याने देशाचं पोट भरत नाही.' अशा शब्दात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (मंगळवार) पंतप्रधान मोदींवर टीका केली.


कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खुद्द सोनिया गांधी यांनी आज विजापूरमध्ये जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. 'भाषणामुळे देशाचं पोट भरत नाही किंवा रोजगारही मिळत नाही.' असं सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या.

सोनिया गांधी नेमकं काय म्हणाल्या?

'मोदीजींना गर्व आहे की, ते चांगलं भाषण देतात. ते तर अभिनेत्याप्रमाणे भाषण देतात. जर त्यांच्या भाषणांनी देशाचं पोट भरता येत असेल तर त्यांनी आणखी भाषणं द्यायला हवी. पण फक्त भाषणांनी पोट भरत नाही. त्यासाठी जनतेला अन्न हवं असतं.' असं म्हणत सोनिया गांधी यांनी मोदींचा खरपूस समाचार घेतला.

दरम्यान, मोदी सरकार काँग्रेस शासित कर्नाटकमध्ये भेदभाव करत असल्याचा आरोपही सोनिया गांधी यांनी केला.

संबंधित बातम्या :

‘भाजपचा भाषण, घोषणाबाजीवर विश्वास नाही, बोलल्याप्रमाणे करुन दाखवतो’

2019 मध्ये मी पंतप्रधान बनू शकतो : राहुल गांधी