सोनभद्र : काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी अखेर पीडित परिवाराची भेट घेतली. पीडित परिवाराला आज सकाळी भेटल्यानंतर काँग्रेसकडून या घटनेतील प्रत्येक पीडित परिवाराला 10-10 लाख रुपये देणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.

प्रियांका गांधी वाड्रा यांनी अखेर 26 तासानंतर शनिवारी सकाळी सोनभद्र हत्यांकाडातील पीडित कुटुंबांची भेट घेतली. मिर्झापूरमधील चुनार गेस्ट हाऊसवर प्रियंका गांधी थांबल्या होत्या तिथे पीडितांच्या कुटुंबियांना आणण्यात आले. शुक्रवारी प्रियांका गांधी यांना पीडित कुटुंबांची भेट घेण्यापासून रोखण्यात आले. प्रियांका गांधी संपूर्ण रात्र मिर्झापूरमधल्या चुनार गेस्ट हाऊसमध्ये थांबल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना माघारी परतण्यास सांगितले. पण पीडित कुटुंबांची भेट घेतल्याशिवाय आपण इथून जाणार नाही असे प्रियांका गांधी यांनी ठणकावून सांगितले. अखेर शनिवारी सकाळी पीडित कुटुंबांना चुनार गेस्ट हाऊसवर आणण्यात आले. तिथे प्रियंका गांधी यांनी पीडितांची भेट घेतली. आस्थेने त्यांची विचारपूस केली.


या परिवाराला भेटल्यानंतर प्रियांका म्हणाल्या की, प्रशासनाच्या सहकार्यानेच ही दुर्दैवी घटना घडली. महिलांविरोधात खोटे गुन्हे नोंदविण्यात आले. आम्ही या पीडितांसोबत आहोत. आम्ही त्यांची लढाई लढू. पीडित परिवारांना 25 लाखांचे अनुदान मिळावे. त्यांच्या जमिनीवर अधिकार मिळावा. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणी देखील प्रियांका गांधी यांनी यावेळी केली.

मी नृशस हत्येचा दंश झेलणाऱ्या गरीब आदिवासींना भेटायला आणि त्यांच्या व्यथा जाणून घ्यायला आले होते. जनतेचा सेवक म्हणून हे माझे कर्तव्य आणि माझा नैतिक अधिकार देखील आहे, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले होते. मला मागील काही तासांपासून चुनार येथे ठेवण्यात आले आहे. मला 50 हजार रुपयांचा जामीन द्यायचा आहे अन्यथा मला 14 दिवस तुरुंगात टाकले जाईल असे सांगण्यात आले आहे. मी आदिवासींना भेटण्याच्या निर्णयावर ठाम आहे. मात्र मला सोनभद्रला जाऊन द्यायचं नाही अशा प्रशासनाला 'वरून ऑर्डर' आहेत, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली होती.

मी कुठलाही कायदा हातात घेतलेला नाही. हवं तर प्रशासनाची इच्छा असेल तर मी एकटी त्या परिवाराला भेटण्यासाठी त्यांच्या गावी जायला तयार आहे. कुठल्याही स्थितीत मी त्या आदिवासींना भेटल्याशिवाय जाणार नाही, असे प्रियांका यांनी म्हटले होते. मी कायदेशीर मार्गाने त्यांना भेटणार आहे मात्र तरीही उत्तर प्रदेश सरकारने हा तमाशा केला आहे, असे त्यांनी म्हटले होते.

काहीही असो, लोक सगळं पाहात आहेत. मला काहीही असो पीडितांना भेटायचं आहे. जर पीडितांना भेटणे हा गुन्हा असेल तर आणि सरकार मला जर जेलमध्ये टाकत असेल तर मी तयार आहे, असे प्रियांका यांनी ट्वीटमध्ये म्हटले होते.

काल राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारवर निशाणा साधला होता. "उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये प्रियांका गांधी यांना बेकायदेशीररित्या अटक करणं चिंतीत करणारं आहे. सोनभद्र हत्याकांडातील पीडित कुटुंबियांना भेटण्यापासून प्रियांका यांना रोखणं सत्तेचा दुरुपयोग आहे. यावरुन हे सिद्ध होतं की भाजप सरकारमध्ये उत्तर प्रेदशात असुरक्षिता निर्माण झाली आहे, असे राहुल यांनी म्हटलं होतं.

सोनभद्र हत्याकांडातील पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी जात होत्या. मात्र पोलिसांनी त्यांना रोखल्याने त्यांनी नारायणपूरमध्येच धरणं आंदोलन केलं. "आम्हाला फक्त पीडितांच्या कुटुंबीयांना भेटायचं आहे. शिवाय माझ्यासोबत फक्त चार लोक असतील, असंही मी सांगितलं होतं. तरीही प्रशासनाने आम्हाला तिथे जाऊ दिलं नाही. आम्हाला का रोखलं याचं उत्तर त्यांनी द्यायला हवं. आम्ही इथे शांततेत बसून राहू." तर जिल्ह्यातल 144 कलम लावल्याने प्रियांका गांधींना रोखल्याचं प्रशासनाने सांगितलं होतं. यानंतर पोलिसांनी प्रियांका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. ताब्यात घेतल्यानंतर प्रियांका गांधींना चुनार गेस्ट हाऊसवर नेण्यात आलं.

काय आहे प्रकरण?
वाराणसीपासून 91 किलोमीटर अंतरावर घोरावल गाव आहे. या गावात एका माजी आयएएस अधिकाऱ्याने 90 एकर जमीन विकत घेतली होती. काही दिवसांपूर्वी ही जमीन गावचा सरपंच यज्ञदत्त भूरियाने विकत घेतली होती. बुधवारी (17 जुलै) दोन दिवसांपूर्वी जमिनीचा ताबा घेण्यासाठी यज्ञदत्त भूरिया 10 ते 12 ट्रॅक्टर आणि हत्यारबंद गुंडांसह पोहोचला. यावेळी गोंड आदिवासी जमातीच्या लोकांनी जमीन ताब्यात देण्यास विरोध केला. यानंतर यज्ञदत्तच्या गुंडांनी केलेल्या बेछूट गोळीबारात 10 जणांचे प्राण गेले, तर 19 जण जखमी झाले आहेत.