Gitanjali J Angmo on Sonam Wangchuk: लडाखी जनतेच्या हक्कांसाठी आयुष्य वेचलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो (Geetanjali Angmo Statement) यांनी आज (2 ऑक्टोबर) केंद्र सरकारवर सडकून टीका केली. गीतांजली यांनी लडाखमधील सध्याच्या परिस्थितीची तुलना ब्रिटिश भारताशी केली. गृह मंत्रालय लडाख पोलिसांचा गैरवापर करत असल्याचे त्यांनी सांगितले. गीतांजली यांनी X वर लिहिले की, "भारत खरोखर स्वतंत्र आहे का? 1857 मध्ये, राणीच्या आदेशानुसार 24 हजार ब्रिटीश सैनिकांनी 30 कोटी भारतीयांवर अत्याचार करण्यासाठी 1लाख 35 हजार भारतीय सैनिकांचा वापर केला. आज, गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार डझनभर प्रशासक 3 लाख लडाखींवर अत्याचार करण्यासाठी 2400 लडाखी पोलिस अधिकाऱ्यांचा गैरवापर करत आहेत."

सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक (Sonam Wangchuk Arrest) 

लडाखला राज्यत्व (पूर्ण राज्याचा दर्जा) मिळावे यासाठी झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर सोनम वांगचुक यांना 26 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांच्यावर कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात पाठवण्यात आले. 24 सप्टेंबरच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात (Students Protest Ladakh) चार जणांचा मृत्यू झाला. संतप्त विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवून दिलं होतं. 

राष्ट्रपतींना पत्र, वांगचुक यांच्या बिनशर्त सुटकेची मागणी  (Geetanjali Angmo Letter to President) 

गीतांजली अंग्मो यांनी बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले. लडाखमधील लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींना आवाहन केले. अंग्मो यांनी हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही पाठवले. पत्रात अंग्मो यांनी सोनम वांगचुक यांच्या बिनशर्त सुटकेची मागणी केली. त्यांनी सोनम यांचे वर्णन हवामान बदलाविरुद्ध आणि मागास आदिवासी भागांच्या विकासासाठी मोहीम चालवणारे शांतताप्रिय गांधीवादी आंदोलक म्हणून केले.

हिंसाचारासाठी सीआरपीएफ जबाबदार

गीतांजली यांनी त्यांच्या पाकिस्तान संबंधांच्या आरोपांचे खंडन केले. रविवारी, त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की वांगचुक नेहमीच गांधीवादी पद्धतीने निषेध करत असत आणि 24 सप्टेंबर रोजी झालेल्या हिंसाचारासाठी सीआरपीएफ जबाबदार होते. अंग्मो यांनी स्पष्ट केले की त्यांच्या पतीच्या पाकिस्तान भेटी हवामान बदलाशी संबंधित होत्या. त्या म्हणाल्या, "आम्ही संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या परिषदेत गेलो होतो. आम्हाला हिमालयीन हिमनद्यांच्या पाण्यात भारत किंवा पाकिस्तान दिसत नाही."

इतर महत्वाच्या बातम्या