अर्थ मंत्रालयाच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. अनेक ठिकाणाहून तशा तक्रारी मिळत आहेत. काळा पैसा बाळगणारे गरीब आणि जनधन अकाउंटधारकांना पैसे देत आहेत. यामध्यामातून ते काळा पैसा नियमित करुन घेत आहेत. मात्र, सरकारची त्यावर करडी नजर आहे.
अर्थ मंत्रालयाचे ट्वीट:
कर चुकवण्यासाठी काही जण इतरांच्या बँक खात्याचा वापर करुन पैसा नियमित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे अशी व्यक्ती आढळून आल्यास त्यांना काळ्या पैशावर कर आणि दंड भरावा लागेल.
तसेच जी व्यक्ती आपल्या खात्याचा इतरांना दुरुपयोग करु देत आहे. त्या व्यक्तीला देखील शिक्षा होईल.
पण तुमचा पैसा काळा नसेल आणि तुम्ही बँकेत भरत असलेले पैसे गेल्या अनेक वर्षातील घरातील बचत आहे. तर असे पैसे बँकेत जमा करण्यास काहीही हरकत नाही. त्यासाठी तुमची चौकशी होणार नाही.
उदा: समजा एखाद्या व्यक्तीने आपले 2 लाख रुपये (काळा पैसा) नियमित करण्यासाठी एखाद्या मित्राला, नातेवाईकाला अथवा दुसऱ्या कुणा व्यक्तीला दिले. त्यासाठी त्या व्यक्तीनं आपल्या खात्याचा वापर केल्यास त्या व्यक्तीची चौकशी करुन त्याला शिक्षा होऊ शकते.
समजा, एखाद्या व्यक्तीनं दोन लाख (काळा पैसा) नियमित करण्यासाठी दिले असल्यास आणि सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला कर आणि दंड भरावा लागेल.
म्हणजेच,
1 लाख रुपयांवर 30% प्रमाणे त्यानुसार दोन लाखांवर 60 हजार टॅक्स द्यावा लागेल.
तसेच 60 हजारावर 200 टक्के दंड आकारण्यात येईल. म्हणजेच एकूण 1 लाख 20 हजार दंड होईल.
म्हणजेच दंड आणि कर मिळून, दोन लाखांपैकी तब्बल 1 लाख 80 हजार रुपयांवर पाणी सोडावं लागेल.