ISRO Mission : मागील काही वर्षांपासून इस्रो (ISRO) अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक चांगला नावलौकिक कमावला आहे. ज्या व्यक्तींनी इस्रोला आज या उंचीवर पोहचवले आहे त्यांचे श्रम आणि निष्ठा ही या संस्थेच्या यशामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. 1962 मध्ये सुरु झालेला प्रवास आज एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचला आहे, हे सांगताना प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरुन येते यामध्ये तीळमात्र शंका नाही. 


डॉ होमी भाभा आणि डॉ विक्रम साराभाई यांच्या योगदानामुळे भारताने अंतराळ क्षेत्रात उंच भरारी घेतली. अर्थात ही यादी काही फक्त दोन नावांची नाही, तर यामध्ये अनेक शास्त्रज्ञांचा समावेश आहे.  ज्यांनी इस्रोच्या अनेक कामगिरींमध्ये महत्त्वाचा वाटा दिला आहे. 21 नोव्हेंबर 1963 साली तमिळनाडूमधील 'ठुंबा' या गावातून भारताच्या पहिल्या रॉकेटने अवकाशात झेप घेतली आणि तेव्हापासून सुरु झाला एक अथांग प्रवास. तेव्हा प्रक्षेपित करण्यात आलेल्या या रॉकेटसाठी संपूर्ण भारतीय बनावटीच्या सामग्रीचा वापर करण्यात आला होता. 


त्यानंतर इस्रोच्या अनेक मोहिमांनी जगाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षर कोरले.  मंगळावर पहिल्याच प्रयत्नात पोहचणारा भारत हा पहिला देश ठरला.  संपूर्ण जगाकडून तेव्हा इस्रोने कौतुकाची थाप स्विकारली. त्याचबरोबर इस्रोची चांद्रयान मोहिम देखील महत्त्वपूर्ण ठरली होती. अशा अनेक मोहिमा आहेत, कामगिरी आहेत ज्या इस्रोने अगदी सहजरित्या पेलल्या आहेत. 


पीएसएलवी


ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान अर्थात पीएसएलव्ही हे 1990 साली विकसित केले आहे. त्यानंतर 1993 साली इस्रोचा पीएलएलव्हीच्या मदतीने पहिला उपग्रह हा अवकाशात झेपावला. इस्रोसाठी ही फार महत्त्वपूर्ण कामगिरी होती कारण यापूर्वी अशी प्रणाली केवळ रशियाकडे होती. त्यामुळे रशियानंतर भारताने देखील ही प्रणाली विकसित करुन अंतराळ क्षेत्रातील आपले स्थान मजबूत करण्यास सरुवात केली. 


पहिली यशस्वी चांद्रयान मोहीम


इस्रोच्या अभिमानाचा दैदिप्यमान प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला तो पहिल्या चांद्रयान मोहिमेपासून. 22 ऑक्टोबर 2008 साली भारताच्या चांद्रयाने अंतराळात भरारी घेतली आणि नोव्हेंबर 8 रोजी भारताचा तिरंगा चंद्रावर चितारण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे हे यान भारतीय बनावटीचे होते.  श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून चांद्रयान - 1 चे प्रक्षेपण करण्यात आले.


जीएसएलवी मार्क -1


ही देखील इस्रोची एक महत्त्वपूर्ण मोहिम आहे. या यानामुळे एखादा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यासाठी मदत होते. या यानामधून केवळ एकच उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करता येतो. या यानाची 2003 मध्ये यशस्वी चाचणी करण्यात आली होती. 


जीएसएलवी मार्क - 2 


जीएसएलव्ही मार्क - 2 ची प्रणाली विकसित करणे हा इस्रोच्या मानाचा एक तुरा होता. जानेवारी 2014 मध्ये जीएसएलव्ही मार्क - 2 हे संपूर्ण भारतीय बनावटीचे इंजिन तयार करण्यात आले. कमी तापमानात देखील योग्य पद्धतीने काम करता येण्यासाठी इस्रोने ही प्रणाली विकसित केली होती. ही प्रणाली विकसित करण्याआधी इस्रोला इतर देशांवर अवलंबून राहावे लागत होते. 


मंगळयानचे यशस्वी प्रक्षेपण 


या मोहिमेमुळे संपूर्ण जगाने इस्रोची पाठ कौतुकाने थोपटली. 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती.  त्यानंतर 24 सप्टेंबर 2014 रोजी या यानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता. भारताच्या पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मोहिम यशस्वी झाली होती आणि त्याचे श्रेय त्यासाठी काम करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांना जातं. यापूर्वी मंगळ ग्रहावर पोहचलेल्या अमेरिका, रशिया या देशांना देखील पहिल्या प्रयत्नात यश संपादन करता आले नव्हते. 


भारतीय क्षेत्रीय नौवहन प्रणाली (Indian Regional Navigation System)


भारताने आपला सातवा नौवाहन उपग्रह 28 एप्रिल 2016 रोजी अंतराळात प्रक्षेपित केला होता. त्यानंतर भारत हा अमेरिका आणि रशिया या दिग्गजांच्या पंगतीमध्ये सामील झाला. 


पीएसएलवी-सी 37


15 फेब्रुवारी 2017 रोजीचा दिवस हा इस्रोच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असाच ठरला होता. कारण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 104 उपग्रहांचं प्रक्षेपण केलं होतं. पीएसएलवी-सी 37 हे यान या उपग्रहांना घेऊन अवकाशात झेपावलं होत. त्यानंतर अंतराळ क्षेत्रात एक इतिहास रचला गेला होता. याआधी रशियाने एकाच वेळी 37 उपग्रह अंतराळात पाठवले होते. तर अमेरिकेने केवळ एकाच वेळी 29 उपग्रह अवकाशात पाठले होते. या 104 उपग्रहांपैकी केवळ तीनच उपग्रह भारताचे होते. उरलेले 101 उपग्रह हे इतर देशांचे आहेत. 


चांद्रयान - 2 मोहिम


अवघ्या जगाचं लक्ष लागलेली भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान मोहीम चंद्राच्या 2.1 किलोमीटरवर जाऊन थांबली होती.  चंद्राच्या 2.1 किलोमीटर अंतराजवळ गेल्यावर विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 हे 22 जुलै 2019 रोजी अवकाशात झेपावलं होतं. चांद्रयान-2 हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं होतं. तर ही  भारताची दुसरी चांद्रमोहीम होती. 


36 वनवेब उपग्रह 


सर्वात मोठ्या रॉकेट LVM3 (लाँच व्हेईकल मार्क III) ने LVM3-M3 मोहिमेचा भाग असलेल्या 36 OneWeb उपग्रहांना 450 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत यशस्वीरित्या प्रस्थापित केले  होते. त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO)  शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला होता. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून (launch pad) उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. LVM3 ने सलग सहाव्यांदा यशस्वी कामगिरी केली आहे.


सध्या इस्रोकडून चांद्रयान -3 सज्ज करण्यात आले असून ते देखील बुधवारी 5 जुलै रोजी अवकाशात झेपावणार आहे. तर इस्रोकडून चांद्रयान नंतर सोलार मोहिमेची धुरा देखील हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.