ना चीप, ना रेडिओअॅक्टिव्ह शाई, पैसे साठवणाऱ्यांवर सॉफ्टवेअरची नजर
एबीपी माझा वेब टीम | 19 Dec 2016 03:38 PM (IST)
लखनौ : दोन हजार रुपयांच्या नोटेत चीप असल्याच्या अफवेपासून रेडिओअॅक्टिव्ह इंकपर्यंत अनेक तर्कवितर्क सर्वसामान्यांनी लढवले. याबाबतचे अनेक खोटे व्हिडिओ आणि रिपोर्ट्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांनी त्यावर आंधळेपणाने विश्वासही ठेवला. इतकंच नाही, तर आयकर विभागाच्या छापेमारीत मोठ्या प्रमाणावर दोन हजाराच्या नोटा सापडण्याला याच गोष्टी कारणीभूत असल्याच्या वल्गनाही केल्या गेल्या. मात्र नव्या नोटांचा शोध घेण्यामागील तर्कशुद्ध कारण आता समोर आलं आहे. बँकिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने आयकर विभाग नोटांचा ट्रॅक ठेवत असल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा करण्यापूर्वीच बँकांच्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले होते, अशी माहिती आयकर विभागातील सुत्रांनी दिली आहे. नव्या नोटांच्या सीरिजविषयी अपग्रेडेड सॉफ्टवेअरमध्ये परिपूर्ण माहिती असल्याचं म्हटलं जातं. देशातील वेगवेगळ्या भागात नोटांच्या वेगवेगळ्या सीरिज आहेत. त्यामुळे एखाद्या राज्यातील सीरिजमधील नोट जेव्हा दुसऱ्या राज्यातील बँकेत आढळते, तेव्हा आयकर विभाग आणि अर्थविभागातील गुप्तचर खातं पंतप्रधान कार्यालयाला माहिती देतं. त्यानंतर ज्या खातेधारकाला त्या नोटा देण्यात आल्या, त्याची माहिती सॉफ्टवेअरच्या मदतीने उपलब्ध होते. काही संशयास्पद आढळल्यास आयकर विभाग छापेमारी करतं. अर्थ विभागातील गुप्तचर खातं, पोलिस यंत्रणा आणि तंत्रज्ञान यांच्या एकत्रित प्रयत्नांना हे यश मिळतं.