Snake in Air India Express Plane : सापाच्या नावाने अनेकांची तारांबळ उडते. एअर इंडिया एक्सप्रेसच्या (Air India Express) विमानात साप (Snake in Plane) आढळल्याने प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. एअर इंडिया एक्स्प्रेसचे केरळहून (Kerala) निघालेले विमान शनिवारी दुबई (Dubai) विमानतळावर उतरले, तेव्हा त्याच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळून आला. यानंत प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली. विमान वाहतूक नियामक मंडळाच्या (DGCA) अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. आता DGCA कडून या प्रकरणाची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसच्या फ्लाइट क्रमांक B737-800 मध्या साप आढळली. हे विमान केरळमधील कालिकत येथून दुबई विमानतळावर पोहोचलं. विमानाच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळल्याने प्रवासी घाबरले. सुदैवानं सापामुळे कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. 






DGCA च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दुबई विमानतळावर पोहोचल्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाच्या कार्गो होल्डमध्ये साप आढळून आला. प्रवाशांच्या हे लक्षात येताच प्रवासी घाबरले. विमानात साप आढळल्याची माहिती विमानतळ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. यावेळी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हे विमान ग्राउंड स्टाफच्या ताब्यात देण्यात आलं.


एअर एशियाच्या विमानातही आढळला होता साप


दरम्यान विमानात साप आढळल्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी या वर्षाच्या सुरुवातीला 10 फेब्रुवारी रोजी मलेशियाला जाणाऱ्या एअर एशियाच्या विमानातही साप आढळून आला होता. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर प्रवाशांना विमानामध्ये काहीतरी रेंगाळत असल्याचं दिसलं. त्यानंतर विमानात साप असल्याची बाब प्रवाशांच्या लक्षात आली. विमान कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर या विमानाचं इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं. सर्व विमान प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं.


पाहा व्हिडीओ : एअर एशियाच्या विमानात साप आढळल्याचा व्हायरल व्हिडीओ