Himachal CM  : हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नावाची घोषणा झाली. आज त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.  शनिवारी  सुक्खू  यांच्या नावाची घोषणा होताच सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली. सुखविंदर सिंह सुक्खू आणि इतर काँग्रेस नेत्यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची काल रात्री भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. 


सुखविंदर सिंह सुक्खू हे आज हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबज उपमुख्यमंत्री म्हणून मुकेश अग्निहोत्री शपथ घेणार आहेत. याआधी शनिवारी शिमल्यात काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत हिमाचल काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला, दोन्ही काँग्रेसचे पर्यवेक्षक भूपेश बघेल, भूपेंद्र सिंह हुडा हेही उपस्थित होते. या बैठकीत सुखविंदर सिंह सुक्खू यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. सुखविंदर सिंह सुक्खू हे हिमाचल प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री आणि मुकेश अग्निहोत्री हे उपमुख्यमंत्री असतील, अशी घोषणा या बैठकीत करण्यात आली. त्यानंतर सर्व 40 आमदारांनी एकमताने सुखविंदर सिंग सुखू यांची नेता म्हणून निवड केली. 
 
सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.  


सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याबद्दल? 


सुखविंदर सिंह सुक्खू हे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या कार्यकाळात एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. नंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.  हिमाचल प्रदेशातील नादौन विधानसभा मतदारसंघातून सुखविंदर सिंह सुक्खू यांनी निवडणूक जिंकली आहे. त्यांनी भाजपच्या विजय कुमार यांचा 3,363 मतांनी पराभव केला. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सुखू हे आघाडीवर होते. सुखविंदर सिंह सुक्खू  यांना 50.88 टक्क्यांसह 36142 मते मिळवली तर भाजपच्या विजय कुमार यांना 46.14 टक्क्यांसह 32,779 मते मिळाली. तर आम आदमी पक्षाचे उमेदवार शांकी ठुकराल यांना केवळ 1,487 मते मिळाली. 


सुखविंदर सिंह सुक्खू हे हिमाचल प्रदेशच्या सध्याच्या राजकारणातील आघाडीचे नाव आहे.  त्यांचा जन्म 27 मार्च 1964 रोजी हिमाचल प्रदेशातील नादौन येथे झाला. आता ते काँग्रेसकडून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.  सुखविंदर सिंग सुखू यांनी नादौन विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पुढे हिमाचल प्रदेश विद्यापीठातून एलएलबीची पदवी मिळवली. 


2003 मध्ये पहिल्यांदा आमदार 


सुखविंदर सिंह सुक्खू हे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. सखू हे 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुखही होते. सिंह सुक्खू यांनी आतापर्यंत 5 वेळा विधानसभा निवडणूक लढवली असून त्यापैकी 4 वेळा त्यांनी विजय मिळवला आहे. 2003 मध्ये नौदान विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर  सुक्खू यांनी 2007, 2017 च्या निवडणुकीत विजय मिळवला. 2013 मध्ये ते हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही राहिले आहेत.