राहुलजी, छोटा भीमलाही कळतं ही हेरगिरी नाही : स्मृती इराणी
एबीपी माझा वेब टीम | 26 Mar 2018 05:53 PM (IST)
'अॅपकडून वैयक्तिक माहिती अॅक्सेस करण्याबाबत मागितलेली परवानगी म्हणजे हेरगिरी नाही, हे तर छोटा भीमलाही माहित आहे' असा टोला स्मृती इराणींनी राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन लगावला.
नवी दिल्ली : भाजपच्या वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. 'अॅपकडून वैयक्तिक माहिती अॅक्सेस करण्याबाबत मागितलेली परवानगी म्हणजे हेरगिरी नाही, हे तर छोटा भीमलाही माहित आहे' असा टोला स्मृती इराणींनी ट्विटरवरुन लगावला. डेटा शेअरिंगवरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये रंगलेलं तुंबळ युद्ध सुरुच आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीयांची हेरगिरी करण्याची आवड असलेले बिग बॉस आहेत' अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्याला उत्तर देताना स्मृती इराणी यांनी 'छोटा भीम' या कार्टून कॅरेक्टरचा आधार घेतला. स्मृती इराणी इतक्यावरच थांबल्या नाहीत. 'तुम्ही सांगता, त्याच्या विरुद्धच तुमची टीम वागते, असं दिसतंय. नमो अॅप डिलीट करण्याऐवजी काँग्रेस अॅपच डिलीट केलेलं दिसतंय' असं स्मृती म्हणाल्या. काय आहे प्रकरण? नरेंद्र मोदी यांचं अधिकृत मोबाईल अॅप 'नमो'च्या माध्यमातून भारतीयांचा डेटा अमेरिकेतील कंपन्यांना विकला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र काँग्रेस पक्षाच्या अधिकृत अॅपमधून भारतीयांचा डेटा सिंगापूरला जात असल्याचा दावा फ्रान्सच्या हॅकरने केला. त्यामुळे काँग्रेस तोंडघशी पडली.