पेट्रोल पंपावर पेटलेला टँकर 5 किमी घेऊन पळाला, मोठी दुर्घटना टळली
एबीपी माझा वेब टीम | 26 Mar 2018 02:26 PM (IST)
पेट्रोल पंपावर पेट्रोल खाली करत असतानाच टँकरला अचानक आग लागली. यावेळी प्रसंगावधान राखत चालकाने टँकर जागेवरुन हलवला आणि शहरापासून दूर नेला.
भोपाळ : मध्य प्रदेशातील नरसिंहपूरमध्ये एका चालकाने आपले प्राण पणाला लावत मोठी दुर्घटना टाळली. गोटेगाव शहरात खरया पेट्रोल पंपावर पेट्रोल खाली करत असतानाच टँकरला अचानक आग लागली. यावेळी प्रसंगावधान राखत चालकाने टँकर जागेवरुन हलवला आणि शहरापासून दूर नेला. टँकरमधून आगीचा धूर निघताच चालक साजिद खान यांनी मोठ्या हिंमतीने टँकर पेट्रोल पंपाहून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर नेला आणि शहरातील मोठी दुर्घटना टाळली. दरम्यान, पेटलेला टँकर रस्त्याने नेताना रस्त्याच्या कडेला असलेल्या लोकांना याची झळ बसली. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. टँकर नेताना चालक साजिद यांना दुखापत झाली. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. साजिदच्या या प्रसंगावधानाचं मोठं कौतुक होत आहे. टँकर पेट्रोल पंपावरच उभा ठेवला असता तर मोठी जीवितहानी झाली असती, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.