Smriti Irani Defamation Suit : भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं (High Court of Delhi) काँग्रेस नेत्यांना समन्स बजावले आहे. स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर करण्यात आलेल्या आरोप प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने काँग्रेस नेत्यांना फटकारलं आहे. हायकोर्टानं काँग्रेस नेत्यांना संबंधित ट्वीट तत्काळ डिलीट करण्याचा आदेश दिला आहे. जयराम रमेश (Jairam Ramesh), पवन खेरा (Pawan Khera) आणि नेटा डिसोझा (Netta D'Souza) यांना समन्स बजावले आहे. या तिन्ही नेत्यांना 18 ऑगस्टला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 


काँग्रेस नेत्यांनी स्मृती इराणी यांच्या मुलीचं गोव्यात सिली सोल्स कॅफे अँड बार नावे अवैध मद्यालय सुरु असल्याचा आरोप केला आहे. स्मृती इराणी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप निराधार असल्याचे इराणी यांनी म्हटलं आहे. मुलीची तसंच आपली बदनामी केली जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. स्मृती इराणी यांना तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर काढावं अशी देखील काँग्रेसच्या नेत्यांची मागणी आहे. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


दरम्यान, याविरोधात स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेत्यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यानंतर आता कोर्टानं काँग्रेसच्या या तिन्ही नेत्यांना समन्स बजावलं आहे. स्मृती इराणी यांनी रविवारी काँग्रेस नेते जयराम रमेश आणि पवन खेरा यांना नोटिसा बजावल्या होत्या. आपल्या मुलीवर निराधार आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी माफी मागा अशी मागणी देखील त्यांनी केली होती. जर त्यांनी बिनशर्त माफी मागितली नाही आणि आरोप मागे घेतले नाहीत तर दिवाणी आणि फौजदारी कारवाई सुरू करु असा इशारा देखील स्मृती इराणी यांनी दिला होता. स्मृती इराणी यांनी आपल्या मुलीवर काँग्रेस पक्षाकडून होत असलेल्या आरोपांवर नाराजी व्यक्त केली आहे. राजकारणाशी काहीही संबंध नसलेल्या आपल्या मुलीवर गांधी घराण्याच्या सूचनेवरुन चुकीचे आरोप करण्यात आले आहेत. आपल्या मुलीची प्रतिमा मिलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे  स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. 


महत्त्वाच्या बातम्या: