नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची ट्विटरवरील लोकप्रियता आणि मिळणाऱ्या रिट्वीटची सध्या जोरदार चर्चा आहे. त्याला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी टोला लगावला आहे. राहुल गांधी सध्या रशिया, इंडोनेशिया आणि कझाकिस्तानमध्ये निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत, असं म्हणत स्मृती इराणी यांनी #RahulWaveInKazakh हा हॅशटॅग वापरला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी ट्विटरवर जास्त प्रमाणात सक्रिय आहेत. त्यांच्या ट्वीटला मोठ्या प्रमाणात रिट्वीट आणि रिप्लाय मिळत आहेत. त्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र या वाढत्या लोकप्रियतेवर आता प्रश्न उपस्थित करण्यात आला आहेत.
राहुल गांधींना मिळत असेलेले रिट्वीट हे फेक असल्याचं वृत्त देण्यात आलं आहे. बॉटच्या माध्यमातून राहुल गांधींचे ट्वीट ऑटो रिट्वीट केले जातात का, असं वृत्त एएनआयने दिलं आहे. त्यानंतर या प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे.
https://twitter.com/divyaspandana/status/921666883824132097
राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्वीट रिट्वीट केलं होतं. अमेरिका आणि पाकिस्तानच्या वाढत्या संबंधांवरील हे ट्वीट होतं. या ट्वीटच्या माध्यमातून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. हे ट्वीट जवळपास 30 हजार जणांनी रिट्वीट केलं.
https://twitter.com/OfficeOfRG/status/919479635909341184
एएनआय या वृत्तसंस्थेने या ट्वीटची पडताळणी केली तेव्हा जास्त रिट्वीट हे इंडोनेशिया, रशिया आणि कझाकिस्तानमधून करण्यात आल्याचं समोर आलं. याच देशांमधून राहुल गांधींच्या ट्वीटला जास्त वेळा रिट्वीट केलं जातं. याच मुद्द्यावरुन स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
https://twitter.com/smritiirani/status/921653143796056064
दरम्यान राहुल गांधी ट्विटरवर पंतप्रधान मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षाही जास्त लोकप्रिय असल्याचं वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वेबसाईटने दिलं आहे.
यावर्षी सप्टेंबरपासून राहुल गांधींनी रिट्वीटच्या बाबतीत मोदींनाही मागे टाकलं आहे. सप्टेंबरमध्ये राहुल गांधांना सरासरी 2784, तर मोदींना सरासरी 2506 रिट्वीट मिळाले. ऑक्टोबरच्या मध्यातही राहुल गांधींच्या रिट्वीटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यांना सरासरी 3812 रिट्वीट मिळाले असून राहुल गांधी मोदींच्या सर्वाधिक सरासरीच्या जवळ पोहोचले आहेत.
मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या ट्वीटला सरासरी 4074 रिट्वीट मिळाले होते.