Cyclone Sitrang : गेल्या काही दिवसांपासून भारतात सितरंग  चक्रीवादळाने कहर केला होता. मात्र आता बंगालच्या उपसागरातून उठणाऱ्या या सितरंग चक्रीवादळाचा धोका आता जवळपास संपला आहे. या वादळामुळे गेल्या 24 तासांत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस झाला. तर यामुळे आता भारतातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 


हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस


पुढील 24 तासांत वायव्य आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात वायव्येकडील वारे सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, तामिळनाडू, पुद्दूचेरी आणि कराईकलमध्ये 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. दरम्यान, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाचे परिवलन अद्यापही आहे. त्यामुळे दिल्ली एनसीआरमध्ये हवेची गुणवत्ता खराब राहिली आणि वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढलं असल्याचं बोललं जातंय.


'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता


30 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेश, रायलसीमा, केरळ आणि माहेच्या किनारपट्टी भागात पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. 30 ऑक्टोबर रोजी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. इतकंच नाही तर आसाम, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम सारख्या ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढील 2 दिवस म्हणजे आज 27 आणि 28 ऑक्टोबर दरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील 5 दिवस देशातील उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.


देशाच्या दक्षिणपूर्व भागात जोरदार पाऊस


बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळामुळे देशाच्या दक्षिणपूर्व भागात जोरदार पाऊस झाला आहे. या मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी रात्री उशिरा बांगलादेशच्या काही भागात सितरंग चक्रीवादळामुळे किमान 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. एएफपी वृत्तसंस्थेनुसार बरगुना, नरेल, सिराजगंज आणि भोला बेट जिल्हा या ठिकाणी अनेकांच्या मृत्यूचे वृत्त आहे. 


संबंधित बातम्या


Cyclone Sitrang : सितरंग चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता; 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा