कल्याण: लग्न म्हटलं की, हौसमौज आली, नटणं मुरडणं आलं... पण कल्याणमधील डॉक्टर श्रीवाणी राजलिंगम हिच्या याच आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या निर्णयानं श्रीवाणी आणि तिच्या कुटुंबाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे.


अवघ्या चार दिवसांवर श्रीवाणीचं लग्न येऊन ठेपलं आहे. 18 नोव्हेंबरला डॉक्टर श्रीवाणीचं लग्न आहे. पत्रिका छापल्या असून, नातेवाईकांना निमंत्रणंही देण्यात आली आहेत. पण नोटाबंदीच्या या निर्णयानं त्यांची खूपच अडचण झाली आहे.



8 नोव्हेंबरला श्रीवणीच्या वडिलांनी बँकेतून पाच लाखांची रक्कम लग्नाच्या खर्चासाठी काढली. लग्नाच्या हॉल बुकींगपासून ते हलवाईपर्यंत सर्वांचे पैसे आपण आता देऊ शकू असं त्यांना वाटलं. पण नोटाबंदीच्या निर्णयांना त्यांना मोठा धक्का बसला.

या निर्णयानंतर श्रीवाणीच्या वडिलांनी पाचशे आणि हजारच्या नोटा पुन्हा बँकेत जमा केल्या. पण आता त्यांना आपले पैसे काढण्यासाठी दिवस दिवसभर बँकेसमोर रांगेत उभं राहावं लागत आहे. ते देखील अवघ्या काही हजारांसाठी. कारण की, बँकेतून पैसे काढण्यासही सरकारनं मर्यादा घातली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत बरीच वाढ झाली आहे.
श्रीवाणीच्या लग्नासाठी तिच्या वडिलांनी नातेवाईक, मित्र यांच्याकडेही मदत मागितली आहे. पण सगळीकडे परिस्थिती सारखीच आहे. त्यामुळे आता त्यांच्या मदतीला देखील कुणीही धावू शकत नाही. त्यामुळे आता त्यांनी सरकारकडून मदतची अपेक्षा व्यक्त केली आहे. श्रीवाणीचं लग्न सुखरुपपणे पार पडावं यासाठी तिच्या कुटुंबाची सध्या बरीच धडपड सुरु आहे.

संबंधित बातम्या:

'नोटाबंदीच्या निर्णयानं आर्थिक यादवी', सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका

बँकांना सुट्टी, एटीएम सुरु, नोटा बदलण्याची मर्यादाही शिथील

सरकारने पैसे काढण्याची आणि नोटा बदलण्याची मर्यादा वाढवली!

फक्त 50 दिवस सहन करा, काळ्या पैशावर हल्लाबोल तीव्र : मोदी