Sidhu Moosewala Murder Case : प्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) यांची हत्या करणाऱ्या शूर्टसना पंजाब पोलिसांनी (Punjab Police) घेरलं आहे. अटारी बॉर्डरवर शूर्टस आणि पंजाब पोलिसांमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती मिळत आहे. शूटर्स जगरूप आणि मनु खुसा या दोघांना पोलिसांनी घेरलं आहे. 


सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील पंजाब पोलिसांसोबत दोन वॉन्टेड शूटर्सची चकमक झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही शूटर्सना पंजाब पोलिसांनी घेरलं आहे. हत्याकांडातील शूटर्स जगरूप रूपा आणि मनप्रीत उर्फ ​​मनू खुसा यांना अटारी सीमेजवळील भकना कलान गावात घेरण्यात आलं आहे.


पंजाब पोलीस आणि शूटर्स यांच्यात चकमक सुरु असून जिल्ह्यातील सर्व पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे मारेकरी शार्प शूटर मनप्रीत मन्नू कुसा आणि जगरूप रूपा यांना पंजाब पोलिसांनी घेरलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यादरम्यान सर्वात आधी शूटर्सनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर चकमक सुरू झाली, अशीही माहिती मिळत आहे. 


हुशियार नगरमध्ये चकमक सुरूच 


संपूर्ण जिल्ह्यातून पंजाब पोलिसांना पाचारण करून दोन्ही शूटर्सना घेराव घालण्यात आला आहे. अटारी सीमेकडे जाणाऱ्या रस्त्यावर भकना गावाजवळ हुशियार नगरमध्ये चकमक सुरू आहे. हा भाग भारत-पाकिस्तान सीमेपासून फक्त 10 किमी अंतरावर आहे. शार्प शूटर एका खोलीत लपून पोलिसांवर गोळीबार करत आहेत. घटनास्थळावरुन मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चकमकीत तीन पोलीस जखमी झाले आहेत. या चकमकीमध्ये एबीपी सांझचा कॅमेरामन सिकंदर हा जखमी झाला. सिकंदरच्या पायाला दुखापत झाली आहे. 


सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या 


पंजाबमधील आप सरकारनं 424 जणांची सुरक्षा काढली होती. या निर्णयाला एक दिवस उलटत नाही तोवर काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत अन्य दोन जण जखमी झाले होते. ही घटना राज्यातील मानसा जिल्ह्यात घडली. आप सरकारनं ज्यांची सुरक्षा कमी केली होती, यामध्ये मुसेवाला यांचाही समावेश होता. दरम्यान, यावर्षी झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मुसेवाला यांनी मानसा जिल्ह्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आम आदमी पक्षाच्या डॉ. विजय सिंघला यांनी पराभव केला होता.