Sidhu Moose Wala Murder Video: पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतरचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शूटर्स हत्या केल्यानंतर मस्तीत पिस्तूल फिरवताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये कार चालवताना दिसणार्‍या व्यक्तीचे नाव कपिल पंडित आहे. त्याच्या शेजारी बसलेली व्यक्ती म्हणजे प्रियव्रत फौजी. मागे डावीकडे बसलेल्या व्यक्तीचे नाव सचिन भिवानी आहे आणि मध्यभागी बसलेला अंकित सिरसा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित सिरसा याने सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार केला होता. अंकित सिरसा सध्या साडे अठरा वर्षांचा असून त्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे.


अंकित सिरसा यांच्यावर पहिल्यांदाच एका व्यक्तीचा खून केल्याचा आरोप आहे. तो फिल्मी स्टाईलमध्ये दोन्ही हातात पिस्तूल फिरवताना दिसत आहे, त्याचप्रमाणे दोन्ही हातात पिस्तुल घेऊन त्याने मुसेवाला यांच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकितने मुसेवाला यांच्यावर सर्वाधिक गोळ्या झाडल्या होत्या. पोलिसांनी अंकितसह सचिन भिवानी यालाही अटक केली असून तो फोटोत अंकित सिरसाच्या डाव्या बाजूला बसलेला दिसत आहे. मुसेवाला यांची हत्या केल्यानंतर तो गाडी घेऊन फिरत होता. 






दिल्ली पोलिसांनी दावा केला आहे की, सचिनने अंकित आणि इतर आरोपीना शस्त्रे पुरवली. हत्येसाठी कारमधून गेलेल्या सर्व जणांना सचिनने वेगवेगळ्या राज्यात लपवून ठेवले होते. फरार झाल्याच्या 34 ते 35 दिवसांत सचिन भिवानी याने 34 ते 35 वेळा या आरोपींचे अड्डे बदलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रविवारी रात्री उशिरा दिल्लीतील काश्मिरी गेट बसस्थानकाजवळून अंकित सिरसा आणि सचिन भिवानी याना पकडले. यावेळी दोघांकडून पंजाब पोलिसांचे तीन गणवेश, 2 पिस्तूल, 19 काडतुसे आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.