नवी दिल्ली: श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपी आफताबची नार्को चाचणी आज होणार नाही. नार्को चाचणीआधी त्याची पॉलिग्राफ चाचणी होणं गरजेचं आहे आणि पॉलिग्राफ चाचणीसाठी कोर्टाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे आफताबच्या नार्को चाचणीसाठी पोलिस आता कोर्टाच्या परवानगीची वाट पाहत आहेत. कोर्टाने जर ही परवानगी दिली तर आफताबची पुढच्या 10 दिवसात या दोन्ही चाचण्या केल्या जातील. 


नार्को टेस्टच्या आधी होणार पॉलिग्राफ टेस्ट
 
श्रद्धा वालकर हत्याकांडामध्ये अनेक गोष्टींचा उलघडा अद्याप झालेला नाही. तिच्या मृतदेहाचे शीर अद्याप पोलिसांच्या हाती लागलं नाही. त्याचसोबत पोलिसांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आरोपी आफताभने चुकीची दिली आहेत. त्यामुळे आफताबकडून या प्रकरणी सत्य जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्याच्या नार्को टेस्टची तयारी सुरू केली आहे. पण आफताबच्या नार्को टेस्टच्या आधी त्याची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात येणार आहे. 


श्रद्धा हत्याकांडाशी संबंधित मोठी बातमी 


श्रद्धा वालकर हत्याकांडासंबंधी दिल्ली पोलिसांच्या हाती एक मोठा पुरावा मिळाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांना जबड्याचा एक तुकडा मिळाला असून तो तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांच्या मते हा जबड्याचा तुकडा श्रद्धाचा असू शकतो. 


श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांना आतापर्यंत श्रद्धाच्या मृतदेहाचं काही अवशेष आणि हाडे सापडली आहेत. ज्या रेफ्रिजरेटरमध्ये श्रद्धाच्या शरीराचे तुकडे ठेवण्यात आले होते ते ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच श्रद्धा आणि आफताबचे काही कपडेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. पण पोलिसांना आतापर्यंत श्रद्धाचे शीर, खुनाचे शस्त्र, रक्ताने माखलेले कपडे सापडले नाहीत. या संबंधी कोणताही प्रत्यक्षदर्शी अद्याप समोर आला नाही. तसेच घटनेचे कोणताही व्हिडीओ फुटेज समोर आलेला नाही. 


नार्को  चाचणी ही एखाद्या हायप्रोफाईल गुन्ह्याच्या तपासात पुराव्याच्या शोधासाठी आरोपीची चौकशी केली जाते. या चाचणी दरम्यान, एक इंजेक्शन आरोपी व्यक्तीला दिले जाते. यानंतर व्यक्ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पोहोचते. अशा परिस्थितीत प्रश्नांची उत्तरे मिळणे सोपे जाते.


श्रद्धा आणि आफताब हे दोघे दिल्लीमध्ये एकत्र राहत होते. मे महिन्यात त्याच्यांत वाद झाला. त्या वादानंतर आफताबने श्रद्धाची हत्या केल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांमधील वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. श्रद्धाचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर असल्याचा संशय आफताबला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.