Satyapal Malik: मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सत्ता येते आणि जाते, सत्ता ही स्थायी नसते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी समजून घ्यावे असे मलिक यांनी म्हटले. इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांना सत्तेवरून कोणीच हटवू शकत नाही असे लोक म्हणायचे. पण, त्यांचीदेखील सत्ता गेली. त्यामुळे परिस्थिती चिघळेल असे काही करू नये असे मलिक यांनी म्हटले.


मलिक यांनी रविवारी, जयपूरच्या राजस्थान विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या  एका कार्यक्रमात उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, देशात वेगवेगळ्या पातळीवर लढाई सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले. तर, युवकदेखील केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारतील असेही त्यांनी म्हटले.  मलिक यांनी म्हटले की, इंदिरा गांधी यांचीदेखील सत्ता गेली होती. त्यांची सत्ता जाणार नाही, असे लोक म्हणायची. सध्या मोदी यांच्या नेतृत्त्वातील सत्ता जाणार नाही असे लोक म्हणत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी समजून घ्यावे की सत्ता कायमस्वरुपी राहत नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल एवढी अराजकता निर्माण करू नका, असे मलिक यांनी म्हटले. 


अग्निपथ योजनेवर प्रश्नचिन्ह


सत्यपाल मलिक यांनी सैन्य भरतीसाठी सुरू असलेल्या 'अग्निपथ' योजनेवरही त्यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे भारतीय लष्कर कमकुवत होईल. तीन वर्षाचीच सेवा असल्याने देशासाठी बलिदान देण्यासाठी असलेली भावना संपून जाईल. देशासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी तरुणांची असलेली प्रतिबद्धता, भावना तीन वर्षांच्या सेवा काळात दिसून येणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 


मलिक यांनी पुढे म्हटले की, मला मिळालेल्या माहितीनुसार, अग्निवीरांना लष्करातील ब्रह्मोससह इतर क्षेपणास्त्रे, शस्त्रे यांना हाताळण्यासही मनाई असणार आहे.  त्यामुळे ही अग्निपथ योजना  भारतीय लष्करासाठी घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 


बेधडक वक्तव्याने मलिक चर्चेत


सत्यपाल मलिक हे अनेकदा आपल्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत  आले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल म्हणून काम करत असताना तीनशे कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाला होता असा खळबळजनक दावा सत्यपाल मलिक यांनी केला होता. कायद्याच्या चौकटीबाहेरील कोणतेही काम आपण करणार नाही, असे म्हणत ती ऑफर नाकारली असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. मेघालयाचे राज्यपाल म्हणून निवृत्त झाल्यानंतर केंद्र सरकारकडून अटक होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती. त्यांच्या या वक्तव्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.  मागील काही महिन्यांपासून मलिक हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत आहेत.