GST Council Meet: जीएसटी कौन्सिलच्या (GST Counsil)  बैठकीत घेण्यात आलेले निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आणि यामध्ये ऑनलाईन गेमिंगला GST अंतर्गत आणणं, 28 टक्के कर लागू करणं आणि कर्करोगाच्या औषधांवरून IGST काढून टाकणं यांसारखे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. जाणून घेऊया, कोणत्या वस्तूंवर दिलासा मिळणार आणि काय महागणार?


ऑनलाईन गेमिंगवर टॅक्स 


GST कौन्सिलच्या बैठकीत ऑनलाईन गेमिंग (Online Gaming), हॉर्स रेसिंग, कॅसिनोच्या संपूर्ण किमतींवर 28 टक्के GST लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन गेमिंगला जीएसटी कायद्याच्या कक्षेत आणण्यात आलं आहे. ऑनलाईन गेमिंगवर जीएसटी लावण्याच्या निर्णयाचं स्पष्टीकरण देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलं की, या विषयावर सविस्तर चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. चर्चेदरम्यान, आजच्या काळात ऑनलाईन गेमिंग उद्योगाचा प्रभाव किती आहे आणि त्यातून किती उत्पन्न मिळू शकतं. या सर्व बाबींवर प्रत्येक राज्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे.


कार खरेदी करणं महागणार 


जीएसटी कौन्सिलच्या बैठकीतील निर्णयामुळे कार खरेदी महागणार आहे. ज्या कारची लांबी 4 मीटरपेक्षा अधिक आहे, इंजिन क्षमता 1500 सीसीपेक्षा अधिक आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स 170 एमएमपेक्षा अधिक आहे, अशा कार्सवर 22 टक्के कंपनसेशन सेस (Compensation Cess) लागू होणार आहे. यामधून सेडान कार्सना वगळण्यात आले आहे. 


आयात केलेलं कर्करोगाचे औषध स्वस्त 


अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत घेण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या निर्णयांबद्दल बोलताना, आता आयात केलेल्या कर्करोगाच्या औषधांवर IGST लावला जाणार नाही. म्हणजेच, हे औषध स्वस्त होणार आहे. जीएसटी कौन्सिलच्या या बैठकीत कॅन्सरवरील औषध Dinutuximab ची आयात स्वस्त होईल, अशी अपेक्षा आधीच व्यक्त केली जात होती. त्याला सरकारनं मंजुरी दिली आहे. दरम्यान, सध्या यावर 12 टक्के IGST आकारला जातो, जो परिषदेनं शून्यावर आणला आहे. या औषधाच्या एका डोसची किंमत 63 लाख रुपये आहे.


चित्रपट गृहांमध्ये जेवण स्वस्त


चित्रपट गृहांमध्ये चित्रपट पाहायला गेल्यानंतर सर्वांची एकच तक्रार असले, ती म्हणजे, चित्रपट गृहांमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ. आतापासून खाण्या-पिण्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​म्हणाले की, सिनेमागृहांमधील खाण्यापिण्याच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीपूर्वी सिनेमागृहांमध्ये उपलब्ध खाद्यपदार्थ आणि शीतपेयेवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावालाही परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.


हे खाद्यपदार्थ स्वस्त 


GST Council च्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी या गोष्टींवरील जीएसटी कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यापैकी न शिजवलेल्या वस्तूंवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच, आता कच्च्या किंवा न तळलेल्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. याशिवाय इमिटेशन, जरीच्या धाग्यावरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


GST Meeting: ऑनलाईन गेमिंग महागलं, 28 टक्के जीएसटी लागू, कॅन्सरचे औषध स्वस्त होणार; जीएसटी कौन्सिलचा निर्णय