जShraddha Murder Case : दिल्लीतील श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder Case) हत्याकांड प्रकरणी आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावाला (Aftab Poonawala) याच्या जामीन अर्जावर आज दिल्लीतील (Delhi Court) न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आफताबच्या जामीन याचिकेवर सुनावणीसाठी 22 डिसेंबर ही पुढील तारीख निश्चित केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, यापूर्वी आफताबने त्याच्या वकिलाला दिल्ली न्यायालयात जामीन अर्ज दाखल करू दिला नव्हता. यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृंदा कुमारी यांनी सांगितले की, जामीन अर्ज चुकून दाखल झाल्याची माहिती पूनावालाकडून ईमेलद्वारे मिळाली. ज्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली. 


 


 






 


प्राथमिक तपास पूर्ण


आफताब पूनावाला यांच्या वकिलाने सांगितले की, अतिरिक्त सत्र न्यायाधीश वृंदा कुमारी 22 डिसेंबरला या याचिकेवर सुनावणी करू शकतात. या प्रकरणातील प्राथमिक तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल व्हायचे आहे, त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले. 9 डिसेंबर रोजी पूनावाला यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ करण्यात आली


श्रद्धा वालकरच्या वडिलांची मागणी


दरम्यान, श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी मीरा-भाईंदर-वसई विरारचे नवे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेतली, तसेच त्यांच्या मुलीच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत दिरंगाईचा मुद्दा उपस्थित केला. विकास वालकर यांनी यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्यासह पांडे यांचीही भेट घेतली. ही बैठक सुमारे 40 मिनिटे चालली. या मुद्द्यावर विकास वालकर यांनी 9 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मीडियासमोर त्यांनी पूनावालाच्या फाशीची मागणी केली. तसेच आरोपींच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणीही केली.


आफताबने मृतदेहाचे केले 35 तुकडे 


आफताब पूनावाला याने दिल्लीतील मेहरौली येथील राहत्या फ्लॅटमध्ये श्रद्धा वालकरची गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे करून ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले आणि तीन आठवड्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. या प्रकरणात आतापर्यंत आरोपी आफताबची नार्को टेस्ट आणि पॉलीग्राफ टेस्ट झाली आहे.