नवी दिल्ली : नऊ गोळ्यांनी शरीराची चाळण होऊनही भारतीय जवानाने मृत्यूवर मात केली. 'देव तारी त्याला कोण तारी' ही म्हण आपण नेहमीच ऐकतो. पण, सीआरपीएफचे कमांडंट चेतन कुमार चिता यांना ही म्हण तंतोतंत लागू पडली आहे.
तब्बल 9 गोळ्या अंगावर घेतल्यानंतरही चेतन कुमार यांना जीवदान मिळालं आहे. महिनाभरापासून कोमामध्ये असलेले चेतन कुमार आता शुद्धीवर आले असून ते बोलू लागले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या बांदीपुरात 14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांशी लढताना चेतन कुमार चिता यांना तब्बल 9 गोळ्या लागल्या होत्या. त्यातली एक गोळी त्यांच्या डोक्यातही घुसली होती. गंभीर अवस्थेत असलेल्या चेतन कुमार यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये हलवण्यात आलं होतं.
एम्समध्ये दाखल केल्यावर 24 तासांत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रकृती स्थिर झाल्यानंतर डॉक्टरांच्या वेगवेगळया टीमने त्यांच्यावर उपचार केले.
एवढ्या गोळ्या झेलूनही त्यांचा आयुष्यासाठी संघर्ष सुरु होता. सांध्यामध्ये फ्रॅक्चर होतं, डोळ्याला दुखापत झाली होती. एम्सच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असलेले चेतन कुमार महिनाभर कोमात होते. आता ते शुद्धीवर आले असून डिस्चार्जसाठी फीट असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी आज चेतन कुमार चिता यांनी रुग्णालयात भेट घेतली.