नवी दिल्ली : विमान प्रवासाचं तिकीट बुक करण्यासाठी लवकरच आधार कार्ड आवश्यक केलं जाण्याची शक्यता आहे. आयटी क्षेत्रातील अग्रणी असलेल्या विप्रो कंपनीकडे याची ब्ल्युप्रिंट विकसित करण्याची जबाबदारी सरकारने दिल्याची माहिती आहे.


येत्या मे महिन्यापर्यंत 'विप्रो' यासंदर्भात अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर प्रवाशांची बायोमेट्रिक माहिती विमानतळांवर वापरण्यात येईल. प्रवाशांच्या अंगठ्याचा ठसा वापरुन त्यांच्या उड्डाणाशी संबंधित सर्व माहिती साठवण्यात येईल. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबत वृत्त दिलं आहे.

नागरी उड्डाण मंत्रालय हवाई प्रवासाच्या बुकिंगसाठी आधार नंबर लिंक करण्याच्या विचारात आहे. ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्ट आवश्यक असतो, त्याप्रमाणे देशांतर्गत विमान प्रवासांसाठी प्रवाशांचं थंब इम्प्रेशन गरजेचं असेल. फक्त एका अंगठ्याच्या जोरावर विमान प्रवासातील सर्व प्रक्रिया सुलभतेने पार पडतील.

सुरक्षेच्या कारणास्तव भारतात सध्या विमान प्रवासात प्रवाशांना तिकीटांसोबत ओळखपत्र दाखवावं लागतं.