National Students Union of India : गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर पक्षात आणखी नाराजी वाढली आहे. गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ भारतीय राष्ट्रीय छात्र संघाच्या (NSUI) 36 विद्यार्थी नेत्यांनी सामूहिका राजीनामा दिला आहे. जम्मू-कश्मीर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिरुद्ध रैना तसेच प्रदेश सरचिटणीस माणिक शर्मा यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळं दिवसेंदिवस पक्षात नाराजी वाढत असल्याचे दिसत आहे. याचा फटका काँग्रेस पक्षाला बसत आहे.
राजीनामा पत्रात गुलाम नबी आझादांचा राहुल गांधींवर निशाणा
पक्ष सोडल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींसह पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आझाद यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचं राजीनामा पत्र पाठवलं होतं. सोनिया गांधींना पाठवलेल्या राजीनामा पत्रात आझाद यांनी लिहिलं होतं की, अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेससोबतचे माझं 50 वर्षांचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारत जोडो यात्रेऐवजी काँग्रेस जोडो यात्रा काढावी, असा सल्लाही गुलाम नबी आझाद यांनी दिला होता. आपल्या राजीनामा पत्रात गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, तुमच्या नेतृत्वाखाली पक्ष चांगली कामगिरी करत आहे. पण दुर्दैवाने राहुल गांधी यांचा पक्षप्रवेश झाल्यापासून, विशेषत: 2013 नंतर तुम्ही राहुल यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर, त्यांनी पक्षातील चर्चेची संपूर्ण ब्लू प्रिंटच उद्ध्वस्त करुन टाकली आहे. सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला करण्यात आल्याचे आझाद यांनी राजीनामा पत्रात म्हटलं होतं.
गुलाम नबी आझाद स्वतःचा पक्ष स्थापन करणार
काँग्रेसला नुकताचा रामराम केलेले गुलाम नबी आझाद स्वतःचा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. त्याचे पहिले युनिट लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये सुरू होईल. त्यांचे निकटवर्तीय जीएम सरोरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसचा राजीनामा दिला होता. राजीनामा देताना त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावरही टीका केली होती. दरम्यान, माजी मंत्री जीएम सरोरी हे देखील जम्मू आणि काश्मीर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ज्यांनी आदल्या दिवशी गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या: