नवी दिल्ली : नोटाबंदीवर शिवसेनेचं तळ्यात-मळ्यात सुरुच आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंनी काहीच दिवसांपूर्वी नोटाबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं, तर दुसरीकडे शिवसेना खासदार भाजपविरोधात दंड थोपटण्यासाठी सरसावले आहेत.
जिल्हा बँकांवरील निर्बंधाविरोधात शिवसेना खासदार मोदींच्या दरबारी दाखल झाले. मोदींच्या बैठकीत मार्ग निघाला नाही तर संसदेत मोदींविरोधात आक्रमक होण्याचा मंत्र उद्धव ठाकरेंनी दिला आहे. त्यामुळे शिवसेनेची नेहमीप्रमाणे चलबिचल सुरु आहे.
शिवसेनेनं एकीकडे नोटाबंदीचं स्वागत केलं असलं तर दुसरीकडे चलनतुटवड्याच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. शिवसेना सत्तेत असतानाही तृणमूलने काढलेल्या नोटाबंदी विरोधातल्या मोर्च्यातही सहभागी झालेली पाहायला मिळाली होती. त्यामुळे मोदींची भेट घेतल्यानंतर शिवसेनेची भूमिका काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सामनातून टीकास्त्र :
'सरकारकडे सध्या एकच काम उरले आहे ते म्हणजे, कोण कोणाच्या खात्यावर पैसे जमा करीत आहे यावर नजर ठेवणे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा किती आला गेला ते नंतर पाहू; पण सरकारचा एक फायदा असा झाला की, तहानभूक, महागाई, बेरोजगारी, काश्मीर प्रश्न, दहशतवाद विसरून लोक बँकांच्या रांगेत उभे आहेत. राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष उडविण्यात सरकार पक्ष यशस्वी झाला असून त्याबद्दल ‘नोटाबंदी’च्या निर्णयाचे स्वागतपर ढोल वाजवावेच लागतील.' अशी टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आली आहे.