नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर सामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आयआरसीटीसीवरुन तिकीट बुक करताना लागणार कन्व्हीनिअन्स चार्ज 23 नोव्हेंबरपासून हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑनलाईन तिकीट बुक करताना सध्या कन्व्हीनिअन्स चार्ज लागतो. वेगवेगळ्या क्लाससाठी हा चार्ज वेगवेगळा असतो. ई-तिकीट बुक करताना स्लीपर क्लाससाठी 20 रुपये आणि एसी क्लाससाठी 40 रुपये सर्व्हिस चार्ज लागतो. इतकंच नाही तर या सर्व्हिस चार्जवर 15 टक्के आणखी एक सर्व्हिस टॅक्स द्यावा लागतो.
रेल्वेच्या या निर्णयामुळे ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर प्रत्येक प्रवाशाचे तिकीटामागे 23 रुपयांपासून 46 रुपयांची बचत होईल.
नोटाबंदीनंतर मोठ्या संख्येने लोक काऊंटरवर जाऊन तिकीट घेत आहेत. तसंच कन्व्हीनियन्स चार्जपासून वाचण्यासाठी लोक काही वेळ रांगेत उभं राहून तिकीट घेणं पसंत करत आहेत. पण आता आयआरसीटीसीवरुन ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी हा अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही.