नवी दिल्ली : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत लक्षवेधी उपस्थित केली. विशेष म्हणजे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही मराठीतच बोलून या लक्षवेधीला पाठिंबा दर्शवला.
सभागृहातल्या सर्व सदस्यांनी यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत असं मतही महाजन यांनी व्यक्त केलं. मंगळवारी शून्य प्रहरात सेना खासदार श्रीरंग बारणे यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती. मराठीला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातले सर्व पुरावे राज्यानं केंद्राकडे सादर केलेले आहेत. त्यामुळे त्याचा विचार करुन तातडीनं ही मागणी पूर्ण करावी अशी मागणी बारणेंनी केली.
मराठीतूनच भाषण करत बारणेंनी ही मागणी लोकसभेत उचलून धरली. त्यावर सुमित्रा महाजन यांनीही मराठीतच सगळ्या सभागृहाला आवाहन केलं. सुमित्रा महाजन या इंदूरमधून खासदार असल्या तरी त्या मूळच्या महाराष्ट्रीय आहेत. विशेष म्हणजे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गेंनाही त्यांनी सहकार्याचं आवाहन केलं. खर्गे हे कर्नाटकातले असले तरी त्यांनाही उत्तम मराठी बोलता येतं.
खर्गेंच्या पाठीमागे बसलेले काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनीही बारणेंच्या मागणीवर प्रतिसाद दर्शवला. त्यामुळे एकंदरीत मराठीच्या या लक्षवेधीवर सर्वपक्षीय खासदारांमध्ये सहमतीचं वातावरण दिसलं.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. मराठी भाषेत 52 बोली भाषांचा समावेश आहे. आतापर्यंत केंद्राने तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या दाक्षिणात्य भाषांसह संस्कृत भाषेला अभिजात दर्जा दिला आहे.