नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही फोन कुणी टॅप करत असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीमध्ये एबीपी माझाशी बोलत होते. ते म्हणाले की, महाराष्ट्रातल्या आधीच्या सरकारने काही प्रमुख लोकांचे फोन टॅप केले होते.  हे टॅपिंग आता परदेशी ॲपच्या माध्यमातून केले जाते.  आज हा विषय संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उचलला जाईल, असं ते म्हणाले. 


राऊत म्हणाले की, ज्या लोकांचे फोन टॅप त्यात मोठ्या संख्येने पत्रकार आहेत.  पत्रकारांचे फोन टॅप करून काय करायचं होतं माहिती नाही.  मुख्यमंत्र्यांचा फोन टॅप झाला का माहिती नाही.. पण महाराष्ट्रातील सरकार बनत असताना अनेक लोकांचे फोन टॅप झाले होते त्याची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही फोन कोणी टॅप करत असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही, असं ते म्हणाले. 


Pegasus Spying: 'भारतात कुणाचीही हेरगिरी नाही, सर्वांची प्रायव्हसी सुरक्षित', भारत सरकारचं स्पष्टीकरण


त्यांनी म्हटलं की,   देशाच्या पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी हे काय चालू आहे हे देशाच्या जनतेला समोर येऊन सांगितले पाहिजे.  संसदीय मंत्र्यांनी काल सर्व विषयांवर चर्चा करू असं म्हटलं आहे.  अनेकदा सरकार बाहेर एक गोष्ट म्हणतं आणि प्रत्यक्ष चर्चेपासून पळ काढतात.  पण यावेळी मागे हटायचं नाही असं सर्व विरोधकांनी ठरवलं आहे, असं ते म्हणाले. 


पंतप्रधान बैठकीला उशिरा आले यावर बोलताना ते म्हणाले की, असं होत आलं आहे असं हे सांगतात पण आधीच्या लोकांनी शेण खाल्लं असेल चांगले पायंडे तुम्ही पाडा ना. आमच्यासाठी तुम्ही संसद बंद पाडू नका तर हे प्रश्न उचलून त्यावर चर्चा करा असे शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितले आहे, असंही ते म्हणाले. 


Pegasus Spyware : काय आहे पेगॅसस स्पायवेअर? ते तुमचे व्हॉट्सअॅप कसे हॅक करु शकते?


मुंबई एअरपोर्टच्या गरबा खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्याबाबत बोलताना ते म्हणाले की,  मी तो व्हिडीओ पाहिला नाही हा कधीच आहे हे पाहावे लागेल.  एअरपोर्टचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत एअरपोर्ट आहे.  असा प्रकार कुणी एअरपोर्टवर करत असतील तर त्यांनी आधी डोकं वर करून एअरपोर्टवरचं नाव पाहावं, असं राऊत म्हणाले.