मी मारलं नाही, त्या अधिकाऱ्याला फक्त ढकललं: रवींद्र गायकवाड
एबीपी माझा वेब टीम | 06 Apr 2017 01:14 PM (IST)
नवी दिल्ली: शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी आज लोकसभेत शून्य प्रहरात आपलं निवदेन मांडलं. यावेळी त्यांनी एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. निवेदनात रवींद्र गायकवाड यांनी सभागृहाची माफी मागितली. पण आपण एअर इंडिया किंवा त्या अधिकाऱ्याची माफी मागणार नसल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं. तसेच एफआयआरमध्ये दाखल करण्यात आलेलं 308 कलम म्हणजेच खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हा रद्द करण्याची मागणीही रवींद्र गायकवाड यांनी केली. ‘तुम्ही माझ्या आईसारख्या आहात, तुमच्याकडून मी न्यायाची अपेक्षा करतो.’ असं म्हणत गायकवाड यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे एअर इंडियाविरोधात गाऱ्हाणं मांडलं. ‘मी अधिकाऱ्याला मारहाण केली हा मुद्दा चुकीचा आहे. अधिकाऱ्यानं माझ्यासोबत अरेरावी केल्यानंतर मला त्यानं धक्का दिला. त्यानंतर मी देखील त्याला ढकललं. याप्रकरणी माझ्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा माझ्यावर अन्याय आहे. त्यामुळे माझ्यावर लावण्यात आलेलं 308 कलम तात्काळ रद्द करण्यात यावं.’ अशी मागणी गायकवाड यांनी केली. लोकसभेत नेमकं काय म्हणाले रवींद्र गायकवाड? ‘एअर इंडिया आणि विमान कंपन्यांनी माझ्यावर आतापर्यंत अन्याय केला आहे. मी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली नव्हती. मला धक्काबुक्की केल्यानंतर मी फक्त त्या अधिकाऱ्याला ढकललं होतं.’ ‘मी बिझनेस क्लासचं तिकीट काढलेलं असतानाही मला इकोनॉमी क्लासमध्ये बसवलं गेलं. त्यानंतर मी तक्रार करण्यासाठी नोंदवही मागितली. मात्र, तेव्हा त्यांनी ते देण्यास नकार दिला. मी निषेध नोंदवण्यासाठी तिथंच बसून राहिलो. त्यानंतर तब्बल 45 मिनिटांनी एक अधिकारी आला. मी त्याला विचारलं की, तुम्ही कोण? त्यावेळी त्यानं मला अत्यतं अरेरावीनं उत्तर दिलं.’ ‘तो अधिकारी मला म्हणाला की, ‘मी एअर इंडियाचा बाप आहे.’ तेव्हा मी त्याला सांगितलं की, मी खासदार आहे. तेव्हा तो मला म्हणाला की, ‘तू काय नरेंद्र मोदी आहेस का?’ असं म्हणत त्यानं माझ्याशी पुन्हा अरेरावी सुरु केली. यावेळी मला धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी माझा संयम सुटल्यानं मी त्या अधिकाऱ्याला ढकललं. तिथं हजर असणाऱ्या एअर होस्टेस्टनं देखील नेमकं काय झालं ते सांगितलं आहे. माझं वागणं चुकीचं नव्हतं.’ ‘संविधानानं मला कुठंही प्रवास करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, एअर इंडिया आणि इतर विमान कंपन्यांनी माझ्या विमान प्रवासावर बंदी आणून मला संविधानानं दिलेला अधिकार हिरावून घेतला आहे. मी एक शिक्षक आहे. विन्रमता ही माझी शिकवण आहे. त्यामुळे जर माझी चूक झाली असेल तर मी संसदेची माफी मागतो, पण एअर इंडिया आणि त्या अधिकाऱ्याची माफी मागणार नाही.’ ‘याप्रकरणी माझ्यावर मीडिया ट्रायलही करण्यात आलं. पण त्या दिवसापासून मी मीडियाच्या हाती लागलो नाही. आज थेट मी संसदेत हजर झालो. गनिमी काव्यानं कसं लढायचं हे आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे. दरम्यान, याप्रकरणी माझ्यावर दाखल करण्यात आलेलं 308 कलम हटवावं. तसेच एअर इंडिया आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी रवींद्र गायकवाड यांनी केली. शिवसेना खासदार अनंत गीते खा. गायकवाडांच्या मदतीला खासदार रवींद्र गायकवाड यांनी आपलं म्हणणं लोकसभेत मांडल्यानंतर, शिवसेनेचे खासदार आणि मोदींच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग मंत्रीपद सांभाळणारे अनंत गीते यांनीही खासदार गायकवाडांची बाजू घेतली. ‘खासदार रवींद्र गायकवाड हे या सभागृहाचे एक सन्मानित सदस्य आहेत. त्यांच्याबाबतीत प्रवासादरम्यान जी घटना घडली, त्याबाबत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र कोणत्याही खासदारावर विमान यात्रेदरम्यान काही धक्काबुक्की झाल्यास थेट खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणं हे अयोग्य आहे.’ ‘हा अन्याय असून, गृहमंत्री राजनाथ सिंह याबाबतीत आपलं म्हणणं मांडतील. याप्रकरणात अद्याप चौकशी सुरु आहे. या चौकशीत सत्य समोर येईल. तुम्ही चौकशी करा आम्ही रोखणार नाही. मात्र कोणत्याही चौकशीशिवाय एअर इंडियासह सर्वच विमान कंपन्यांनी खासदार गायकवाडांच्या प्रवासावर बंदी घालणं, हा कोणता न्याय आहे? हे मोदींच्या नेतृत्त्वातील सरकार जे जनतेचं आहे, ते कोणत्याही चौकशीशिवाय एका खासदारावर बंदी आणतं, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.’ ‘याची मला लाज वाटते. मात्र तरीही मी हवाई वाहतूक मंत्र्यांना हात जोडून विनंती करतो की अशाप्रकारचा एकतर्फी निर्णय होऊ नये. खासदार गायकवाडांवरील बंदी हटवण्यात यावी.’ हवाई वाहतूक मंत्र्यांचं उत्तर: याप्रकरणी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी या निवदेनावर उत्तर दिलं. ‘खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणात कायदा आपलं काम करेल. सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही, असं अशोक गजपती राजू म्हणाले. संबंधित बातम्या: