अनंत गीते यांनीही खासदार गायकवाडांची बाजू घेतली.
"खासदार रवींद्र गायकवाड हे या सभागृहाचे एक सन्मानित सदस्य आहेत. त्यांच्याबाबतीत प्रवासादरम्यान जी घटना घडली, त्याबाबत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मात्र कोणत्याही खासदारावर विमानयात्रेदरम्यान काही धक्काबुक्की झाल्यास थेट खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणं हे अयोग्य आहे. हा अन्याय असून, गृहमंत्री राजनाथ सिंह याबाबतीत आपलं म्हणणं मांडतील.
याप्रकरणात अद्याप चौकशी सुरु आहे. या चौकशीत सत्य समोर येईल. तुम्ही चौकशी करा आम्ही रोखणार नाही. मात्र कोणत्याही चौकशीशिवाय एअर इंडियासह सर्वच विमान कंपन्यांनी खासदार गायकवाडांच्या प्रवासावर बंदी घालणं, हा कोणता न्याय आहे.
हे मोदींच्या नेतृत्त्वातील सरकार जे जनतेचं आहे, ते कोणत्याही चौकशीशिवाय एका खासदारावर बंदी आणतं, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. याची मला लाज वाटते.
मात्र तरीही मी हवाई वाहतूक मंत्र्यांना हात जोडून विनंती करतो की अशाप्रकारचा एकतर्फी निर्णय होऊ नये. खासदार गायकवाडांवरील बंदी हटवण्यात यावी", असं अनंत गीते म्हणाले.
मला धक्का दिल्याने मीही धक्का दिला : खा. गायकवाड
दरम्यान, खासदार रवींद्र गायकवाड यांनी आज लोकसभेत आपलं निवेदन सादर केलं. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत माझा, पंतप्रधानांचा अवमान केला. तसंच त्यानेच मला धक्का दिल्याने मी सुद्धा धक्का दिला. मात्र मी त्याला मारहाण केल्याचं उठवण्यात आलं. चौकशीविनाच माझी मीडिया ट्रायल सुरु आहे. इतकंच नाही तर दिल्ली पोलिसांनी माझ्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
मात्र लोकप्रतिनिधीवर चौकशीविना असा गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे. हा गुन्हा हटवावा आणि विमानप्रवासावरील बंदी उठवावी अशी मागणी खासदार रवींद्र गायकवाड यांनी केली.
हवाई वाहतूक मंत्र्यांचं उत्तर
दरम्यान, याप्रकरणी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी निवेदन दिलं. खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणात कायदा आपलं काम करेल. सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही, असं अशोक गजपती राजू म्हणाले.