संसदेतील शिवसेना पक्ष कार्यालयात खासदारांची बैठक झाली. सध्या ते शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील घरी आहेत.
दरम्यान 'शिवसैनिक कभी भागते नही' अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. कोणी धक्काबुक्की केली, असा सवालही त्यांनी विचारला.
दुसरीकडे सरकार लक्ष देत नसेल, तर आम्ही सरकारमध्ये राहून गप्प बसू का, असं खासदार आनंदराव अडसूळ यांनी नमूद केलं.
लोकसभेत गायकवाडांच्या प्रकरणावर शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ 11 वाजता स्थगन प्रस्ताव ठेवणार आहेत.
हा स्थगन प्रस्ताव लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन अमान्य करण्याचीच शक्यता आहे. मग त्यावेळी त्यांना झिरो अवरमधे बोलू देण्याची संधी मिळावी अशी विनंती करण्यात येईल.
काय आहे प्रकरण?
उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला.
विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे.
‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली.
भारतीय विमान संघाची बंदी
भारतीय विमान संघानं गायकवाडांवर बंदी घातली आहे. जवळपास भारतातील सर्व विमान कंपन्यांनी गायकवाडांवर बंदी घातली आहे. भारतीय विमान संघामध्ये गोएअर, जेट एअरवेज, जेटलाईट, इंडिगो यासारख्या प्रमुख विमान कंपन्यांचा समावेश आहे.
कोण आहेत रवींद्र गायकवाड?
– रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत
– लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.
– उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचित आहेत
– रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते.
– दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे.
– तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला.
संबंधित बातम्या