मुंबई: शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांची गुंडगिरी विमानातल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुण्याहून दिल्लीला परतताना रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानात अधिकाऱ्याला मारहाण केली. या घटनेनंतर एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी रवी गायकवाड यांची चांगलीच कानउघडणी केली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला आहे.


रवि गायकवाड पुण्याहून दिल्लीला निघाले होते. त्यांच्याकडे बिझनेस क्लासचं तिकीट होतं. मात्र विमान फक्त इकॉनॉमी क्लाससाठी होतं. त्यामुळे दिल्लीत पोहोचल्यानंतर गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला, त्याचं पर्यवसान वादात होऊन गायकवाडांनी सुकुमार नावाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली. या प्रकारानंतर आता गायकवाड यांना एअर इंडियानं काळ्या यादीत टाकलं आहे. दरम्यान, शिवाय शिवसेनेनंही त्यांच्याकडे याविषयी खुलासा मागितला आहे.

 

काय आहे प्रकरण?

 

रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. त्यांचं बिझनेस क्लासचं तिकीट असताना त्यांना इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला.

विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे.

 

‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही,  मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो.  पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो,  अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’,  अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली.

 

कोण आहेत रवींद्र गायकवाड?

- रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत
- लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.
- उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचीत आहेत
- रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते.
- दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे.
- तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला.

VIDEO:



संबंधित बातम्या:

... म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड

एअर इंडियाकडून खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात तक्रार