नवी दिल्ली : वेळ सायंकाळी साडेचारची... ठिकाण- 6 जनपथ.. पवारांचं दिल्लीतलं निवासस्थान.. शिपिंग खात्याच्या सचिवांचा ताफा बंगल्यावर पोहचतो. त्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, श्रीरंग बारणेही येतात, आणि शेवटी खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.

 

 
पवारांच्या बंगल्याबाहेर जवळपास 10- 15 गाडयांचा ताफा उभा असतो. प्रश्न दोन तीन आहेत, एक मुंबईतल्या बीपीटी जागेतल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा, दुसरा पुण्यातल्या HAL या कंपनीसंदर्भातला.. पुढचे जवळपास चाळीस मिनिटे पवारांच्या दरबारात यावर
चर्चा होते.

 



 

 

हे वर्णन ऐकल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की ही घटना नेमकी आजचीच आहे की 2014 च्या आधीची? कारण या प्रश्नासाठी सगळ्या यंत्रणेनं पवारांच्याकडे जायचं काय कारण? पण बहुधा सत्ता गेली तरी 6 जनपथचा रुबाब मात्र कायम आहे असं दिसतंय.

 

 

मुंबईतल्या बीपीटी अर्थात बॉम्बे पोर्ट ट्रस्टवरच्या जागेवर अतिक्रमणांचा विषय गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यासंदर्भात इथले रहिवाशी, काही एनजीओ संघटना यांनी आपलं म्हणणं पवारांच्या कानावर टाकलं. त्यासाठी गडकरींच्या भेटीची वेळ मागून घेण्यात आली. पण मीटिंगला माझ्याकडे येण्यापेक्षा मीच तुमच्याकडे येतो असं सांगत गडकरींनी औदार्य दाखवलं.

 

 



 
त्यानंतर शिपिंग खात्याचे सचिव आणि इतर अनेक अधिकाऱ्यांचा ताफा, खुद्द केंद्रीय मंत्री, स्थानिक खासदार अरविंद सावंत असे सगळे मीटिंगसाठी पवारांच्या बंगल्यावर पोहचले. विशेष म्हणजे या बैठकीआधी शिपिंग मिनिस्ट्रीचे अधिकारी पवारांना ब्रीफिंगही देत होते.

 

 

संसदेचं अधिवेशन चालू असताना अनेक प्रश्नासंदर्भात सचिवांना संसदेच्या चकरा माराव्या लागतात. मात्र यावेळी 6 जनपथवरच्या ब्रीफिंगमध्ये अधिकाऱ्यांना व्यस्त पाहून कुजबूज सुरु झाली. जवळपास अर्धा तास मीटिंग चालली. बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या हद्दीतल्या लाखो
रहिवाश्यांशी संबंधित हा प्रश्न आहे.

 

 
मीटिंगमधून बाहेर आल्यावर या संघटनांचे नेते, माजी नगरसेवक, वकील अशी सगळी बऱ्यापैकी खुशीत होते. काहीतरी मार्ग निघेल अशी आशा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. यावेळी सहा जनपथवर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

 

 

 

"गोवा-मुंबई महामार्गाच्या कामासंदर्भात मला नितीनजींना भेटायचं होतं, त्यासाठीच आलो", असं सुनील तटकरेंनी सांगितलं. पण एकीकडे महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन सुरु असताना घाईघाईनं केवळ या बैठकीसाठीच तटकरे आले असावेत का हा सतावणारा प्रश्न आहे.

 

 



 
या तिघांमध्ये नेमकी काय खलबतं झाली हे जाहीर व्हायला कदाचित काही दिवसांचा अवधी लागेल. पण एक आहे की आज पवारांचं निवासस्थान काही तासांसाठी का होईना पॉवर सेंटर बनलेलं होतं. शरद पवार यांच्या पक्षाची सत्ता ना महाराष्ट्रात आहे ना केंद्रात. मात्र तरीही आपलं राजकीय वजन त्यांनी कायम ठेवलंय.

 
दिल्लीत त्यांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाला देशाच्या राजकारणातले whos who हजर होते. राजकारण देशाचं असो की महाराष्ट्राचं... पवार अजूनही बेदखल झालेले नाहीत हाच संदेश पुन्हा एकदा 6 जनपथवरुन दिला गेलाय...

 

6 जनपथचा दिमाख या बंगल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर लगेचच जाणवतो. बंगल्यासमोर एवढं प्रशस्त आणि लांबलचक लॉन आहे की दिसताक्षणी डोळे थंडावतात. इथल्या आवारात सदैव मोर नाचत असतात. योगायोग म्हणजे आजही मोर बरोबर बंगल्याच्या टेरेसवर मस्त पिसारा फुलवून उभा होता... त्याच दिमाखात!!!