कोलकाता : प्रसिद्ध बंगाली लेखिका आणि समाजसेविका महाश्वेता देवी यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. कोलकात्याच्या बेलव्यू रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 90 वर्षांच्या होत्या.


 
गेल्या काही काळापासून महाश्वेता देवी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. महाश्वेता देवी यांना भारतीय साहित्य विश्वात अत्यंत मानाचं स्थान आहे. पद्मश्री, पद्मविभूषण या नागरी सन्मानांबरोबरच साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.

 
'हजार चौरासी की माँ' सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांबरोबरच त्यांचं बिहार, बंगाल, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधल्या आदिवासी जमातींच्या संघर्षावर केलेलं लिखाण विशेष महत्त्वाचं ठरलं आहे.

 
त्याचप्रमाणे 'आरण्येर अधिकार' ही त्यांची आदिवासींच्या आयुष्यावर आधारित कादंबरीही प्रसिद्ध ठरली होती. आदिवासी जमातींवर त्यांनी केवळ लेखनच केलं नाही तर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढाही दिला. रुदाली या महाश्वेता देवींच्या लघुकथेवर चित्रपटही आला होता.