मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराला उणेपुणे काही तास उरलेले असतानाही शिवसेनेशी भाजपनं कुठलीही चर्चा केलेली नाही. इतकंच नव्हे तर शिवसेनेला एकही मंत्रिपद दिलेलं नाही. त्यामुळे उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेना बहिष्कार टाकण्याची शक्यता आहे.


 
एबीपी माझाला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. गेल्या वेळी खासदार अनिल देसाई शपथ घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले. मात्र भाजप आणि सेनेतील वादामुळे ते शपथ न घेताच विमानतळावरुन मुंबईला परतले.

 
त्यामुळे शिवसेनेच्या हक्काचं एक मंत्रिपद रिक्त आहे. या विस्तारात शिवसेनेच्या खासदाराचा नंबर लागेल अशी अटकळ होती, मात्र ती फोल ठरण्याची चिन्हं दिसतायत.

 

 

केंद्रीय मंत्रिपदासाठी शिवसेना लाचार होणार नाही : उद्धव ठाकरे


 
‘मंत्रिपदासाठी शिवसेना लाचार होणार नाही. शिवसेना स्वाभिमानी पक्ष आहे. जे हक्काचं आहे ते घेणार’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

आठवलेंचं स्वप्न पूर्ण, भामरेंची सरप्राईज एण्ट्री


 
मोदी-शाह यांनी शिवसेनेला ठेंगा दाखवला असला तरी रामदास आठवले यांचं मंत्रिपदाचं स्वप्न मात्र पूर्ण झालंय. आज आठवले यांनी सकाळी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

 
आठवले महाराष्ट्रातील प्रमुख दलित नेत्यांपैकी एक आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्यात. त्यामुळे दलितांची सहानुभुती मिळवण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.

 

दुसरीकडे जळगावातील पॉवरफुल नेते एकनाथ खडसे यांची राज्य मंत्रिमंडळातून गच्छंती झाल्यानंतर धुळ्याच्या डॉ. सुभाष भामरे यांना भाजपनं केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलंय. मराठा समाजाचे डॉ. भामरे यांची प्रतिमा स्वच्छ राजकारणी अशी आहे.

 
उत्तर महाराष्ट्रातील बिघडलेलं समीकरण दुरुस्त करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सुरु आहे.
मात्र महाराष्ट्रातील दोन नव्या केंद्रीय मंत्र्यांना नेमकी कुठली खाती मिळतात याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.



राज्य मंत्रिमंडळात मात्र सेनेची एन्ट्री :


 

 

केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला ठेंगा मिळाल्याची चिन्हं असताना दुसरीकडे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा जोरावर आहे. येत्या 7 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त पक्का करण्यात आलाय.

 

 

यावेळी एकूण नऊ जण मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. यापैकी 4 जण भाजपचे, 3 जण मित्रपक्षांचे तर दोघे जण शिवसेनेचे असतील असंही सांगितलं जात आहे.

 

 

राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार 7 जुलैला, 9 मंत्र्यांचा शपथविधी