श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी मोठा राजकीय भूकंप झाला. भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. जम्मू-काश्मीरच्या एकूण राजकीय परिस्थितीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी यांच्यातील युती तुटल्याचा आम्हाला आनंद आहे. भाजप आणि पीडीपी यांच्यातील युती देशद्रोही युती होती, अशी तिखट प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
संजय राऊत पुढे म्हणाले की, 'भाजपला अखेर सुबुद्धी सुचली आहे. मात्र काश्मीरमध्ये सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा हिशेब सरकारला द्यावा लागेल. शिवसेनेने आधीही या अनैसर्गिक युतीचा विरोध केला होता. ज्या पक्षापासून देशाला धोका आहे, तो पक्ष भाजपला चालतो, पण महाराष्ट्रात शिवसेना नाही.'
जम्मू-काश्मीरमधील शस्त्रसंधी केंद्र सरकारने उठवल्यानंतर भाजप आणि पीडीपीमध्ये तणाव निर्माण झाले आहे, असं सांगितलं जात आहे. याशिवाय सीमेवरील तणाव, शस्त्रसंधीचं उल्लंघन, जवानांवर होणारी दगडफेक, कठुआ गँगरेप याबाबतच्या मुद्द्यावरुन भाजप आणि पीडीपीमध्ये मतभेद निर्माण झाले होते, त्याचा शेवट आज युती तुटण्यातून झाला. तसेच जम्मू काश्मीरात राज्यपाल राजवट लागू करावी अशी मागणीही यावळी भाजपने केली आहे.
राम माधव काय म्हणाले?
भाजपचे नेते राम माधव म्हणाले की, मागील काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये ज्या घटना घडल्या, त्यावर माहिती घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत सल्लामसलत केल्यानंतर आज आम्ही निर्णय घेतला की, युती सरकार चालवणं शक्य नाही.
मागील तीन वर्षांपेक्षा जास्त काळापासून आम्ही आमच्या बाजूने योग्यरित्या सरकार चालवण्याचा प्रयत्न करत होतो. राज्याच्या तीन प्रमुख भागांमध्ये विकास करण्याचा प्रयत्न करत होतो. पण सध्या राज्यात जी परिस्थिती आहे, त्यामध्ये दहशतवाद आणि हिंसाचाराचं प्रमाण अधिक आहे. फुटीरतावाद वाढला आहे. नागरिकांचा मूलभूत अधिकार आणि व्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आहे, असं राम माधव म्हणाले.
संबधित बातम्या
जम्मू काश्मीरमध्ये भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढला, सरकारमधून बाहेर