नवी दिल्ली : शिवसेनेचे युवा नेते आणि महाराष्ट्राचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली. आदित्य ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. सोनिया गांधी यांनी नागरिकत्व कायद्यावर बोलावलेल्या विरोधकांच्या बैठकीला शिवसेनेची उपस्थिती नव्हती. त्या पार्श्वभूमीवर राहुल-आदित्य यांच्या भेटीकडे पाहिलं जात आहे.
आज सकाळी आदित्य यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचीही भेट घेतली. त्यानंतर ते राहुल गांधी यांना भेटले. राहुल गांधी यांच्या तुघलक लेनमधल्या निवासस्थानी दोघांमध्ये भेट झाली. नागरिकत्व कायद्यावरुन सध्या असलेली परिस्थिती, महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी कशी होत आहे याची माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी राहुल गांधींना सांगितल्याची माहिती समोर येत आहे.
जवळपास अर्धा तास झालेल्या या बैठकीत राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी मुद्द्यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट झाली, मात्र महत्त्वाचे नेते भेटले की राहुल गांधींच्या कार्यालयातून त्याचा फोटो जारी केला जातो. आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांचा कोणताही फोटो अद्याप समोर आलेला नाही.
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला आमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीत आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, मनमोहन सिंह यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिलं होतं. मात्र गांधी कुटुंबातलं कुणी या शपथविधी सोहळ्याला हजर नव्हतं. महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेनंतर राहुल गांधी आणि आदित्य यांची ही पहिलीच भेट होती. दिल्ली दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी फेसबुक, अॅमेझॉनच्या कार्यालयालाही भेट दिली. तसेच रायसीना डायलॉग या कार्यक्रमातही सहभाग घेतला.