अयोध्या (उत्तर प्रदेश) : भव्य राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी येत्या 25 नोव्हेंबरला शिवसेनेसह काही हिंदुत्ववादी संघटना अयोध्येमध्ये एकत्र येणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या (शनिवार) आणि परवा 'चलो अयोध्या' हा नारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये तणाव वाढत असून व्यापारी वर्गाच्या मनात भीतीची भावना आहे.
अयोध्येतील व्यापाऱ्यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. फैजाबादच्या संयुक्त व्यापार मंडळाने विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसभेला विरोध केला आहे, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरेंचा अयोध्येतील कार्यक्रम
अयोध्येतल्या क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे वेगवेगळे समाज, भोजपुरी सभा यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. 'लक्ष्मण किला'वर उद्धव ठाकरे यांचा साधुसंतांकडून सत्कार होणार आहे. रामचरित मानस आणि रामललांची मूर्ती घेऊन उद्धव ठाकरे येणार आहे. पूजेनंतर ते साधूसंतांकडून आशीर्वाद घेतील. 'लक्ष्मण किला'वरील कार्यक्रम संपल्यानंतर उद्धव ठाकरे चालत शरयूच्या काठावर जाऊन आरती करतील.
शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीचा कलश घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. शिवनेरीवर बाल शिवाजी आणि जिजामाता यांना अभिवादन करुन उद्धव ठाकरेंनी माती सोबत घेतली. संजय राऊत, राजन विचारे, एकनाथ शिंदे, विश्वनाथ महाडेश्वर अयोध्येला गेले आहेत.
शिवसेनेविषयी धाकधूक
शिवसेनेबद्दल लोकांच्या मनात थोडीशी धाकधूक आहे. शिवसेना उग्र संघटना असल्याचा अयोध्येतील स्थानिकांचा समज आहे. व्यापाऱ्यांच्या मनातही गर्दीची धास्ती आहे. या कार्यक्रमामुळे काही दिवस प्रवेशबंदी होऊन लोकांना आत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होतं. ही गर्दी म्हणजे ग्राहक नसल्याने व्यापारी चिंताग्रस्त आहेत.
सुरक्षेत वाढ
सध्या अयोध्येला सुरक्षा व्यवस्था वाढलेली असून एका किल्ल्याचं स्वरुप आलं आहे. संपूर्ण शहरात सीआरपीएफ, पीएसी आणि पोलिसांच्या तुकड्या तैनात आहेत. ड्रोन कॅमेराने निगराणी करण्यात येत असून राम जन्मभूमीला चारही बाजूंनी सुरक्षेचा वेढा आहे.
मुंबईकर उत्तर भारतीयांचा पाठिंबा
मुंबईतील उत्तर भारतीयसुद्धा या दौऱ्याला पाठिंबा देत आहेत. राज्यभरातील विविध भागातून शिवसैनिक अयोध्येला रवाना झाले आहेत. पुण्यातील शिवैसनिक बाईकने तर नाशकातील शिवसैनिक विशेष ट्रेनने अयोध्येकडे प्रयाण करत आहेत.
वारकरी अयोध्येला
आषाढी-कार्तिकीला पंढरीची वाट धरणारे वारकरी राम जन्मभूमी अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. शिवसैनिकांच्या 'जय श्रीराम' एक्स्प्रेसमध्ये वारकरीही सहभागी झाले आहेत. अयोध्येत रामाचं भव्य मंदीर उभं रहावं अशी त्यांचीही मागणी आहे.
शिवसैनिकांचा ड्रेसकोड
नाशिकहून अयोध्येला जाणाऱ्या शिवसैनिकांना ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर पुढच्या बाजूला 'चलो अयोध्या'चा नारा आणि श्रीरामाची प्रतिमा, तर मागील बाजूला बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो, आपापल्या जिल्ह्याचं नाव आहे. अयोध्येत गेल्यावर सर्व शिवसैनिक एकसंघ दिसावेत, यासाठी ड्रेस कोड ठरवण्यात आला आहे. टोपीवर एका बाजूला जिल्ह्याचं नाव आणि दुसऱ्या बाजूला जय श्रीरामचा नारा आहे.
हर हिंदू की यही पुकार...
अयोध्या दौऱ्यावेळी 25 नोव्हेंबरला महिला आघाडी आणि युवासेनेनं अयोध्येत येऊ नये, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. महिलांना लक्ष्मणरेषा पाळण्याचं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं. अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी “हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार” असा नवा नारा दिला.
आखाडा परिषदेने निमंत्रण धुडकावलं
साधू-संतांची सर्वात मोठी संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने शिवसेनेचं आमंत्रण केवळ धुडकावलंच नाही तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर राजकीय खेळी केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. "आखाड्याशी संबंधित साधू-संत शिवसेनेच्याच नाही तर 25 नोव्हेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमातही सहभागी होणार नाहीत," असं आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेसची रामभक्ती
रामाचे भक्त काँग्रेस किंवा बसपमध्येही असू शकतात. भाजपला वाटतं की राम फक्त त्यांचा आहे. रामाचे भक्त कोणत्याही पक्षात असू शकतात. आम्हीही रामभक्त आहोत. मात्र निवडणुकीच्या तोंडावरच राम मंदिराचा विषय, रामभक्ती का उफाळून येते हा प्रश्नच आहे, असं नागपूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे विचारत आहेत.