नवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख कथित एन्काऊंटरप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यात ट्वीटयुद्ध सुरु आहे. राहुल गांधी यांनी ट्वीटद्वारे अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अमित शाह सत्यापासून लांब पळू शकत नाहीत, असं राहुल गांधी यांनी ट्वीट केलं होतं. त्यावर केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी राहुल गांधींवर प्रतिहल्ला केला.

नुकतेच सोहराबुद्दीन कथित एन्काऊंटरप्रकरणी सीबीआयचे मुख्य तपास अधिकारी संदीप तामगाडगे यांचा जबाब नोंदवण्यात आला. भाजप अध्यक्ष अमित शाह हे कथित एन्काऊंटरचे सूत्रधार आहेत, असं संदीप तामगाडगे यांनी सांगितले होते.

संदीप तामगाडगे यांच्या जबाबचा आधार घेत, राहुल गांधी यांनी अमित शाहांवर निशाणा साधला. " गीतेमध्ये सांगितले आहे की, तुम्ही सत्यापासून लांब पळू शकत नाही. अमित शाह हेच सोहराबुद्दीन एन्काऊंटरचे सूत्रधार असल्याचं संदीप तामगाडगे यांनी आपल्या साक्षीत म्हटल आहे. हा माणूस अध्यक्ष होणं, भाजपसाठी योग्य नाही." असं ट्वीट राहुल गांधींनी केलं होत.


" अमित शाह यांना 2014 मध्ये क्लिनचीट मिळाली आहे, हे असत्याची मशिन राहुल गांधी यांना माहित नाही का? राजकीय हेतूने अमित शाह यांना फसवण्यात आलं, असंही कोर्टाने स्पष्ट केलं होत. राहुल गांधी सांगतील का, की त्यांच्या शासनात हे कोणाच्या आदेशावरुन करण्यात आलं होतं?" अशा शब्दात केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी राहुल गांधींना प्रतिउत्तर दिलं. मी निश्चितपणे सांगू शकते, राहुल गांधी यांनी कधी गीता वाचली नसणार. कारण ते इतकं खोटं बोलले नसते, असंही त्या म्हणाल्या.